वाई पोलीस ठाण्यातील डी.बी. पथकाने २४१ कि.मी. चा प्रवास करून मिनीट्रक, जनरेटरसह आरोपींना घेतले ताब्यात
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई येथून चोरीस गेलेला टेम्पो व जनरेटर अवघ्या 24 तासात हस्तगत करत चातुर्याने आरोपीच्या मुसक्या पोलीसांनी आवळण्यात यश मिळविले.
सोशल मिडीयाचा प्रभावी वापर व अहोरात्र मेहनत करून वाई पोलीसांनी केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, वाई-पाचगणी रोडवर हॉटेल सनई शेजारी फिर्यादी संतोष सुर्यवंशी याचे यश बांबू मर्चंट नावाचे गोडावून आहे.
30 जून रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयाने टाटा कंपनीचा 709 ई एक्स कंपनीचा अंदाजे 1 लाख रुपये किंमतीचा मिनी ट्रक व एक कमीन्स कंपनीचा 125 केव्ही पॉवरचा सुमारे 4 लाख रुपयांचा जनरेटर असा एकूण 5 लाखाचा मुद्देमाल अज्ञात चोरटयाने लांबवला होता.
याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर अज्ञाताविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी पथक बनवून ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्नास सुरूवात केली. दरम्यान सोशल मिडीयावरूनही पोलीसांना याबाबत ट्रेस मिळाला.
आरोपी जनरेटर विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पोलीस नकली खरेदीदार बनून मध्यस्तापर्यंत पोहचले व तेथून मूळा धरण येथे टेम्पो व जनरेटर विक्रीच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या मुसक्या त्यांनी आवळल्या. पोलीसांनी प्रशांत बाळासाहेब गायकवाड (वय – 29 वर्ष) व भैय्या सिकंदर शेख (वय 34, दोन्ही रा. वळण, ता. राहूरी, जि. अहमदनगर) यांना अटक केली.
सदरच्या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलीस उपनिरीक्षक संजय मोतेकर, सहाय्यक फौजदार विजय शिर्के, कॉन्टेबल सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड यांनी सहभाग घेतला होता. अधित तपास सहाय्यक फौजदार रमेश कोळी करीत आहेत. अवघ्या चोवीस तासात पोलीसांनी गुन्हयाचा छडा लावल्याने पोलीसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.