दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाईच्या वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना खब-यामार्फत मिळालेल्या माहितीवरून पसरणी घाटामध्ये सायंकाळी भरधाव वेगात आयशर टेंपोचा चित्तथरारक पाठलाग करून त्याला घाटातील सोळा नंबर एस.टी. बसथांब्यावर थोपविण्यास या पथकाला यश आले असता त्या टेंपोची तपासणी केली असता त्यामध्ये आपट्याच्या पानांनी भरलेली विनापरवाना पोती आढळून आल्याने टेंपोसह ६ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करून चालकाला ताब्यात घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनविभागाच्या धडाकेबाज कारवाईमुळे विनापरवाना लाकूड व पानांची वाहतूक करणा-यांचे धाबे दणाणले आहेत. वनविभागाचे प्रमुख अधिकारी असलेले महेश झांजुर्णे यांनी दिलेली माहिती अशी की, ३० जून २०२१ रोजी वनविभागाचे महेश झांजुर्णे, वनरक्षक वैभव शिंदे, परखंदीचे सुरेश सूर्यवंशी यांना खब-यामार्फत मिळालेल्या माहितीवरून आयशर टेंपो क्रमांक G J – 15 Y 0486 यामधून आपट्याच्या पानांनी भरलेल्या पोत्यांची वाहतूक विनापरवाना होत असल्याची माहिती प्राप्त झाली. मग अधिकारी व कर्मचा-यांनी त्याचा पाठलाग वाईपासून सुरु केला असता, टेंपोचालक मेहमूदखान रहीमखान पठाण व क्लीनर येयुबखान बशीरखान पठाण या दोघांच्या लक्षात येताच त्यांनी आपला टेंपो भरधाव वेगात वाई पाचगणी रस्त्यावर असलेल्या पसरणी घाटाकडे वळवला.
त्याचा पाठलाग या अधिका-यांनी सुरु केल्याने अखेर घाटातील नागेवाडी गावाकडे जाणा-या १६ नंबर बस थांब्यावर हा टेंपो पळून जात असताना अडविण्यात यश आले. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी टेंपोची तपासणी केली असता त्यामध्ये पोत्यात भरलेल्या आपट्याची पाने मिळून आली. या वहातुकीसाठी आवश्यक लागणा-या परवान्यांची वरील चालकांच्याकडे मागणी केली असता त्यांच्याकडे कसलाही परवाना न आढळून आल्याने वनविभाग पथकाने तत्काळ वरील दोन्ही चालकांसह टेंपो ताब्यात घेतला.
या कारवाईत ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. त्याचबरोबर वरील दोन्ही व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. अधिक तपास अधिकारी महेश झांजुर्णे करीत आहेत. सध्या वाई वनविभागाने विनापरवाना होत असलेल्या लाकूड व पानांच्या वाहतुकीवर करडी नजर ठेवून गुन्हे दाखल करण्याचा सपाटा ठेवला आहे.