विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
पुणे : बहिणीला भेटण्यासाठी गेलेल्या एका अट्टल गुन्हेगारावर रहाटणी (पिंपरी) परिसरातून कारमधून उतरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयानक होता की, या हल्ल्यात संबंधित गुन्हेगाराचा जागीच तडफडून मृत्यू झाला.
निशांत सुरवस (रा.सज्जनगड,राहटणी, पिंपरी पुणे) असे मृत्यू झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत हा त्याच्या मित्रांसोबत रहाटणी येथील बहिणीला भेटण्यासाठी रविवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गेला होता. त्याचवेळी अचानक कारमधून उतरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी निशांतवर कोयत्याने हल्ला सुरु केला.
हल्लेखोरांचा रोष पाहून निशांतचे मित्र जीव मुठीत धरून घटनास्थळावरून पळून गेले. हल्लेखोरांनी निशांतच्या डोक्यावर आणि शरीरावर कोयत्यानं सपासप अनेक वार केले होते. हा हल्ला इतका भयानक होता की, निशांत जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यातच त्याचा तडफडून मृत्यू झाला.
या हल्ल्याची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी त्वरित दाखल झाले. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. आणि त्यांची चौकशी सुरू केली आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.