माणिक पवार: महान्यूज लाईव्ह
भोर, दि. २९ – भोर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या आदर्श प्राथमिक शाळा मॉडर्न करण्यासाठी जास्तीत जास्त निधी देणार असल्याची माहिती देत तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नसरापूर शाळेसाठी आगामी काळात भरीव निधी देणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी ‘महान्यूज लाईव्ह’ शी बोलताना दिली.
नसरापूर ( ता. भोर ) येथील प्राथमिक शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांच्या विशेष प्रयत्नातून चार लाखाचा निधी मंजूर झाला असून दुरुस्ती कामाचे शुभारंभ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच गणेश दळवी, ग्रामसेवक विजयकुमार कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य नामदेव चव्हाण, सुधीर वाल्हेकर, उषा कदम, विक्रम कदम मुख्याध्यापिका मंगल मालुसरे, सागर खैरमोडे, शाळा व्यवस्थापन अध्यक्षा संध्या ननावरे आदी शिक्षक उपस्थित होते.
नसरापूर येथील प्राथमिक शाळेत परिसरातील गरीब, शेतकरी, शेतमजुरांची मुले शिकतात. या शाळेतील चार वर्गाच्या डागडुजी, इमारतीचे रंगरंगोटी तसेच १२खिडक्यांची दुरुस्ती अशी कामे करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक विजयकुमार कुलकर्णी यांनी दिली आहे. शाळा दुरुस्तीसाठी गावातील व्यापारी आणि दानशूर व्यक्तींनी देखील शिक्षणाला प्राधान्य देऊन लोकसहभाग उभारावा असे नागरिकांमधून सकारात्मक चर्चा होत आहे.