खंडाळा : महान्यूज लाईव्ह
यंदा विभागात वळीवाच्या पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नाही. त्यामुळे काळगांव विभागातील पेरण्या लांबल्या होत्या. त्यातच तौक्ते चक्रीवादळाने संपूर्ण महाराष्ट्राला तडाखा दिला. त्या वादळामुळे दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस या विभागात झाला. त्यानंतर पाऊस गेल्याने लोकांनी युध्दपातळीवर भुईमूग, भात, सोयाबीन, मका पिके पेरुन घेतली. सुमारे 80 टक्के पेरणी लोकांनी या काळात पूर्ण केली.
दोन तीन दिवसाच्या पावसाच्या उघडीपीच्या काळात ही पेरणी झाली. त्यानंतर पुन्हा सलग 4 ते 5 दिवस पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे पीके उगवण्यास पोषक असे वातावरण तयार झाले. 4-5 दिवस सलग पाऊस पडल्यानंतर कालपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शिवारात कोळपणीची एकच हातघाई उसळलेली दिसून येते. तसेच ज्यांची किरकोळ पेरणी राहून गेली आहे त्यांनी देखील ती पूर्ण करण्यासाठी गडबड करत आहेत.
ग्रामीण भागात सुरुवातीच्या काळात डोक्याने ओढणारा कोळप्याचा वापर जास्त प्रमाणात कोळपणीसाठी केला जात असे. या कोळप्याला दोन माणसांची आवश्यकता भासत असे. एक कोळपा ओढण्यासाठी आणि दुसरा तो कोळपा पुढे दाबण्यासाठी. परंतू सायकल कोळपा आल्यामुळे हे कोळपे हल्ली दिसेनासे झाले आहेत. सायकल कोळप्यामुळे एकच व्यक्ती पीकामध्ये कोळपू शकतो. त्यामुळे सर्वत्र सायकल कोळप्याने लोक पीके कोळपत असल्याचे दिसत आहे.
सध्या पिके कोळपण्यासाठी पोषक वातावरण आहे. आता कोळपल्यामुळे पुढे मोठया प्रमाणात येणाऱ्या तणाला प्रतिबंध घालता येतो. काळगांव विभागातील वाडया वस्त्यावर सध्या कोळपणीची एकच धांदल चालू असल्याचे दिसून येत आहे.
या विभागात जास्त पाऊस असतो. त्यामुळे बहुतांशी लोक भाताचे पीक घेतात. हे पीक करताना लावणीची पध्दत वापरली जाते. लावणीसाठी रोपे तयार करण्यासाठी बी टाकले जाते. त्यानंतर संबंधित वावरामध्ये नांगरले जाते. हे सुध्दा काम सध्या सुरु आहे. लावणीच्या पध्दतीमुळे शेतातील तण कमी होते तसेच पीकाचे उत्पादन देखील जास्त येते. यामुळे अशा पध्दतीचे नांगरण्याचे काम सुध्दा मोठया प्रमाणात सुरु आहे.
गयाबाई डाकवे, महिला शेतकरी : एकंदरीत संपूर्ण शिवार माणसांनी गजबजून गेला आहे. पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे सर्व लोक कामात व्यस्त आहेत. पाऊस उघडल्यामुळे शिवारात सध्या एकच हातघाई सुरु आहे. कोळपणीच्या माध्यमातून पिकातील जास्तीत जास्त तण काढण्यास मदत होत आहे. त्यामुळे भांगलणी करताना जास्त त्रास होत नाही. अजून एकदा कोळपणी झाली तर पीक चांगल्या पध्दतीने येण्यास मदत होईल.