खंडाळा : महान्यूज लाईव्ह
खंडाळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या शिरवळ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता ताणली गेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला खिंडार पाडत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुनील देशमुख यांना ९ मते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिजवाना काझी यानांही ९ मते अशी समसमान मते मिळाल्यानंतर सरपंच व निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मी पानसरे यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर सुनील देशमुख यांना मतदान केल्याने सुनील देशमुख हे एका मताने विजयी झाले.
यावेळी राष्ट्रवादीला राष्ट्रवादीनेच भाजप- शिवसेनेला बरोबर घेत खिंडार पाडल्याने शिरवळमध्ये आमदार मकरंद पाटील,सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, खंडाळा पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे यांच्या वर्चस्वाला दुसऱ्यांदा धक्का बसला आहे.
शिरवळ ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक 2017 साली होऊन राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडत सरपंचपदी भाजप-शिवसेना प्रणित आघाडीच्या लक्ष्मी पानसरे या विजयी झाल्या होत्या तर उपसरपंचपदी दिलीप गुंजवटे यांची निवड झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये ठरलेल्या सुञानुसार दिलीप गुंजवटे यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीने भाजप-शिवसेना गटाला धक्कांतञ देत राष्ट्रवादीच्या सुनिल देशमुख यांची निवड झाली होती.
दरम्यान,राष्ट्रवादीच्या उपसरपंचपदाच्या वाटपपञाप्रमाणे व मोठ्या घडामोडी घडत सुनिल देशमुख यांनी तब्बल अडिच वर्षाच्या कालावधीचा उपभोग घेतल्यानंतर राजीनामा अस्ञ उगारत उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता.
यावेळी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उपसरपंचपदाच्या निवडणूकीला मुहूर्त लागत 28 मार्च रोजी उपसरपंचपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीकडून ग्रामपंचायत सदस्या रिजवाना काझी यांची उमेदवारी होण्याची दाट शक्यता असताना राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची मांदियाळी निर्माण झाली असताना राष्ट्रवादीला खिंडार पाडत राष्ट्रवादीचे उपसरपंच सुनिल देशमुखसह प्रकाश परखंदे, संतोष उर्फ बाळू खुडे, सहयोगी सदस्या मंगल क्षिरसागर, शिवसेनेच्या एका गटातील रुपाली गिरे, ज्योती चव्हाण यांनी भाजप-शिवसेनेच्या गटाकडे पुन्हा कुच केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त धक्कांतञ बसला.
त्यामुळे उपसरपंचपदाच्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादीकडून आमदार मकरंद पाटील, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले,खंडाळा पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे यांच्यासह भाजप-शिवसेना गटाच्या भाजप ओबीसी सरचिटणीस अनुप सूर्यवंशी, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख प्रदिप माने यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
दरम्यान,निवडणूक निर्णय अधिकारी तथा सरपंच लक्ष्मी पानसरे, निवडणूक निरीक्षक डॉ. दर्शन काकडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बबबनराव धायगुडे यांनी निवडणुकीची प्रक्रिया सुरु केल्यानंतर राष्ट्रवादीकडून रिजवाना काझी यांनी उपसरपंचपदासाठी तर राष्ट्रवादी बंडखोर सुनील देशमुख यांनी भाजप-शिवसेना यांना सोबत घेत उपसरपंचपदासाठी पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला.
यामध्ये गुप्त मतदान प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादीच्या रिजवाना काझी यांना ९ तर राष्ट्रवादी बंडखोर सुनील देशमुख यांना ९ अशी समसमान मते मिळाल्यानंतर सरपंच लक्ष्मी पानसरे यांनी आपल्या अधिकारातील मत राष्ट्रवादी बंडखोर सुनील देशमुख यांना मतदान केल्याने सुनील देशमुख हे एका मताने विजयी झाले.
यावेळी उपसरपंचपदी निवडून आल्यानंतर सुनील देशमुख यांचा निवडणूक निरीक्षक डॉ. दर्शन काकडे ,सरपंच लक्ष्मी पानसरे,ग्रामविकास अधिकारी बबनराव धायगुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्यांसह शिवसेनेचे प्रदीप माने , शहरप्रमुख विजय गिरे, सागर पानसरे आदी उपस्थित होते. यावेळी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली शिरवळ पोलीसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.