कर्मचाऱ्याने सापडलेली रक्कम व महत्वाची कागदपत्रे संबंधितांकडे केली परत
कारखान्याच्या वतीने प्रामाणिकपणाबद्दल कर्मचाऱ्यांचा सत्कार करत दिली शाबासकीची थाप
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना 30 हजार रुपये व कागदपत्रे सापडली. मात्र या कर्मचा-यांनी 3 हजार रुपये व कागदपत्रे संबंधित व्यक्तीकडे परत केली. या प्रामाणिकपणाबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक डी.एन.मारकड यांनी संतोष शिंदे व सदाशिव बरकडे या कर्मचाऱ्यांचा सत्कार करत शाबासकीची पाठीवर थाप देत कौतुक केले.
कारखान्याचे कर्मचारी संतोष शिंदे व सदाशिव बरकडे हे 21जून रोजी कामानिमित्त इंदापुर अर्बन बँकेत गेले होते. तेथून बाहेर आलेवर त्यांना बँकेसमोर प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये 3 हजार व काही कागदपत्रे सापडली. त्यानंतर संतोष शिंदे व सदाशिव बरकडे यांनी कागदपत्रातील नावावरून दूरध्वनीवरून संपर्क साधून मोहन नारायण पवार (रा.कौठळी ता.इंदापूर) यांना कारखान्यावर बोलावून सदरची रक्कम व कागदपत्रे प्रामाणिकपणे परत केली.
या प्रामाणिकपणाबद्दल संतोष शिंदे व सदाशिव बरकडे यांचे कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, संचालक राजवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील व संचालक मंडळाने कौतुक केले.











