खंडाळा : महान्यूज लाईव्ह
मिरजे (ता.खंडाळा) गावच्या हद्दीमध्ये राहत्या घरासमोर शेतीच्या वादावरून चार जणांना दगड, काठी व हाताने मारहाण करीत जखमी केल्याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात महिलेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली आहे.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, खंडाळा तालुक्यातील मिरजे याठिकाणी हेमंत मुकुंद कडाळे हे कुटुंबियांसमवेत राहतात. दरम्यान, गुरुवारी (दि. २४ जून रोजी) सकाळी १० वाजता हेमंत कडाळे हे कंपनीमधून घरी आले असता त्याठिकाणी चुलत चुलते दत्तात्रय तुळशीराम कडाळे, दिपक दत्तात्रय कडाळे, लक्ष्मी दिपक कडाळे, आकाश दिपक कडाळे हे हेमंत कडाळे यांच्या घरासमोर येत हेमंत कडाळे यांना बाहेर बोलवून घेतले.
यावेळी संबंधितांनी हेमंत कडाळे यांना माळ नावाच्या शेतामध्ये फनपाळी का मारली अशी विचारणा केली. यावेळी हेमंत कडाळे यांनी सदरचे क्षेत्र हे आमच्या मालकीचे असल्याने फनपाळी मारल्याचे सांगताच संबंधितांनी हेमंत कडाळे यांच्यासह भाऊ भूषण कडाळे ,वडील मुकुंद कडाळे,आई अनिता कडाळे यांना दगड, काठी व हाताने मारहाण करीत जखमी केले.
याप्रकरणी हेमंत कडाळे यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रय कडाळे, दिपक कडाळे, लक्ष्मी कडाळे, आकाश कडाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत शिरवळ पोलीसांनी संबंधितांना अटक करीत खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार पांडुरंग हजारे हे करीत आहेत.











