मुंबई : महान्यूज लाईव्ह
एकीकडे महाविकास आघाडीत विसंवाद असल्याच्या चर्चा आणि दुसरीकडे भाजप शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी सोडत नसताना अधिवेशनाच्या मुद्द्यावर आज भाजपच्या नेत्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली..मिलींद नार्वेकरांनी तातडीने पाठीमागून गाडीतून येऊन उध्दवसाहेब, यांना गाडीत घ्या, शिवबंधन बांधून टाकू असे मिश्कीलीने म्हटले आणि हास्यकल्लोळ झाला..!
आज विधानभवन परिसरात बऱ्याच दिवसानंतर भाजप व शिवसेनेच्या नेत्यांदरम्यान हलकाफुलका संवाद रंगला.. त्याला निमित्त झाले, पावसाळी अधिवेशन..! मुख्यमंत्र्यांची गाडी विधानभवनाबाहेर पडत असताना विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, प्रसाद लाड, गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी थांबवली.
मुख्यमंत्र्यांनीही गाडी थांबवत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक निवेदन दिले. निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वाचले. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या गाडीतून मिलींद नार्वेकर उतरले. तेवढ्यात दरेकर यांनी ठाकरे यांना तुमच्या गाडीत आम्हाला घ्या असे म्हटले, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी फक्त एकालाच जागा मिळेल असे उत्तर दिले आणि सारेच हसले.
तेवढ्यात नार्वेकर यांनी उध्दवसाहेब, हे तिघे तुम्हाला घेरण्यासाठी आले नाहीत ना? असे मिश्किलपणे विचारत या तिघांना गाडीत घ्या, शिवबंधन बांधून टाकू असे म्हटले.. त्यावर पुन्हा हशा पिकला.. मात्र तेवढ्यात दरेकर यांनी हजरजबाबीपणे आम्ही केव्हाही येऊ शकतो असे सूचक विधान केले.











