वानवडी : महान्यूज लाईव्ह
१७ जून रोजी पहाटे तीन वाजता रिक्षाला हात करून रिक्षात बसलेल्या दोघांनी काळेपडळ, हडपसर नजिकच्या पुणे रेल्वे क्रॉसिंगच्या अंडरग्राऊंड बोगद्याजवळ रिक्षा थांबवली व रिक्षाचालकास कोयत्याचा धाक दाखवून लुटले. यात रिक्षाचालकाकडे पैसे मिळाले नाहीत, म्हणून चालकाचा मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले.
याचा गुन्हा वानवडी पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे, अप्पर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, परीमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या सूचनेनुसार वानवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड, पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर, सहायक निरीक्षक जयंत जाधव, संतोष तानवडे, हवालदार अमजद पठाण, संजय बागल, रासगे, नाईक, देवीकर, गायकवाड सागर जगदाळे, अनित चिव्हे, गणेश खरात व दिपक भोईर यांच्या पथकाने तपासास सुरवात केली.
दिपक भोईर यांना यासंदर्भात गुप्त खबऱ्यांकडून या प्रकारच्या गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती मिळाली. त्याची खात्री करण्यासाठी २० जून रोजी पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. यावेळी रात्रीच्या सव्वा आठ वाजता पोलिसांनी शादाब यूसूफ अन्सारी (वय १९ वर्षे, व्यवसाय भाजीपाला विक्री, रा. गल्ली नंबर २४, बालाजी किराणा दुकानाजवळ, सय्यदनगर, हडपसर), यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचा साथीदार फैय्याज अन्सारी ( रा. उरुळी देवाची, आदर्शनगर) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोयत्याचा धाक दाखवून चोरलेले दोन मोबाईल फोन व एक कोयता असा ३० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.










