विजय सोनवणे : महान्यूज लाईव्ह
नगर : व्याजाने घेतलेल्या साडेपाच लाखाचे व्याजासह दहा लाख दे… जर पैसे द्यायचे नसतील तर तुझी जमीन माझ्या नावावर करून दे…नाहीतर तुमच्या घरातील एकालाही जिवंत सोडणार नाही.. अशी धमकी देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करून व्याजाच्या पैशात बळजबरीने ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. त्यावरून सावकारावर गुन्हा दाखल झाला. असा गुन्हा दाखल होण्याची कर्जत तालुक्यातील ही तिसरी घटना आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, फिर्यादी प्रितम चौधरी ( नाव बदलले आहे; रा.दळवीनगर, ता.कर्जत) यांनी कर्जत पोलिसात फिर्याद दिली की, महेंद्र उर्फ गणेश नाना नेटके व इतर दोघे सर्व (रा. नेटकेवाडी कर्जत) यांनी फिर्यादी प्रितम चौधरी व भावाच्या घरात घुसून त्यांच्या नातेवाईकांना व्याजाने घेतलेले साडेपाच लाख रुपये व त्यावरील व्याज अशी तब्बल दहा लाख रुपयांची रक्कम देण्याची मागणी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
जाताना त्यांनी फार्मट्रॅक कंपनीचा निळ्या रंगाचा (एम.एच.१६ एफ ६७६६) ट्रॅक्टरही बळजबरीने नेत आमचे दहा लाख आणून दे आणि मग ट्रॅक्टर घेऊन जा, नाहीतर तसे जमत नसेल तर तुझी जमीन माझ्या नावावर करून दे. नाहीतर तुमच्या घरातील एकालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.
यावरून कर्जत पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र सावकारकी कायदा कलम ३९ प्रमाणे गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी सूत्रे हाती घेतली. नेटकेवाडीत जाऊन आरोपींचा नीटनेटका समाचार घेतला आणि आरोपीच्या मुसक्या आवळून आरोपींकडून बळजबरीने नेण्यात आलेला ट्रॅक्टरही जप्त केला.
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केलेल्या आवाहनानंतर सावकारकीच्या तिसऱ्या गुन्ह्याची नोंद झाली असल्याने तालुक्यात चोरून अवैधरित्या सुरू असलेल्या सावकारकी क्षेत्रात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. आता सावकरकीची अनेक प्रकरणे समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस अंमलदार सलिम शेख, उद्धव दिंडे, अमित बर्डे, मनोज लातूरकर यांनी केली.
सावकारकीचा ‘मॅटर’ असेल तर तात्काळ पोलिसांना कळवा
कुणीही अवैध सावकारकी करु नये. कोणत्याही नागरीकाला वसुलीसाठी सावकाराकडुन वारंवार फोन करणे, घरी येणे, शिवीगाळ-मारहाण करणे, महागड्या वस्तु उचलून नेणे असे प्रकार घडत असतील तर तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करा. सावकाराकडून कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आवाहनच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तालुक्यातील नागरिकांना केले आहे.











