प्रदिप जगदाळे : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्रात बार्शीमध्ये मोनॉक्लोनाल कॉकटेल अँटीबॉडीजचा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर बारामतीत जगन्नाथ हॉस्पिटलमध्ये दोन दिवसापूर्वी हाच प्रयोग एका डॉक्टरांवर व बेळगाव जिल्ह्यातील एका महिला रुग्णावर बारामतीतील डॉक्टरांनी यशस्वी करून दाखवला. अर्थात याकरता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्परतेने केलेली मदत अत्यंत महत्त्वाची ठरली.
कोरोनाच्या रुग्णावर अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग बारामतीमध्ये करण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमेडीसिवीर, टोसिलिझुमॅब, प्लाझ्मा अशा विविध प्रकारच्या उपचार पद्धतीचा अवलंब करण्यात आला. आता या मोनॉक्लोनाल कॉकटेल अँटीबॉडीज चा वापर करून कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णांना पाठबळ मिळणार आहे.
बारामतीतील जगन्नाथ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या दोन रुग्णांवर या थेरपीचा प्रयोग यशस्वी झाला. हे इंजेक्शन उपलब्ध होण्याची अडचण भासत असल्याने महिला रुग्णाचे नातेवाईक व काटेवाडीतील यशश्री हॉस्पिटल व यशश्री डेडिकेटेड कोविड सेंटरचे संचालक डॉ. राकेश मेहता यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनिलकुमार मुसळे यांच्याशी संपर्क साधला.
यातील गांभीर्य लक्षात घेत श्री. मुसळे यांनी अजितदादांना याची कल्पना दिली आणि तेथून चक्रे वेगाने फिरली. औषध विक्रेता संघटनेचे नेते जगन्नाथ शिंदे यांनी लागलीच हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली व त्याप्रमाणे इंजेक्शन्स उपलब्ध झाली. या इंजेक्शनचा वापर केल्यानंतर दोन्ही रुग्णांच्या प्रकृतीत अत्यंत वेगाने लक्षणीय बदल झाला.
यासंदर्भात डॉक्टर चाकूरकर व डॉक्टर विकास लोणकर यांनी अधिक माहिती दिली. या अँटीबॉडीज इंजेक्शनच्या स्वरुपात असून, स्वित्झरलँड मधील रोश या कंपनीने त्या बनवल्या आहेत. भारतामध्ये सिप्ला कंपनी या इंजेक्शनचे मार्केटिंग करत आहे. ही इंजेक्शन्स मर्यादित आहेत. त्यांची किंमत देखील खुप आहे. एका इंजेक्शनमध्ये दोन रुग्णांना डोस दिला जातो. यामध्ये एक डोस 60 हजार रुपयांना पडतो.
यासंदर्भात डॉक्टर चाकूरकर व डॉक्टर लोणकर म्हणाले. शरीरातील आयजीजी इमिनोग्लोबीलीन प्रमाणे ते काम करते. कॅसीरीव्हीमॅब व इम्डेव्हिमॅब दोन डोस एकत्र केल्याने त्याला कॉकटेल असे म्हणतात. वयाच्या बारा वर्षाच्या पुढील 40 किलो वजनापुढील रुग्णांना आजाराची लागण झाल्यापासून सहा दिवसांच्या आत हे इंजेक्शन देण्याची शिफारस आहे.
वयाच्या 55 वर्षांवरील ज्यांना दमा, रक्तदाबाचा त्रास आहे अशांना ही इंजेक्शन दिले जाते. वेळेत इंजेक्शन दिल्यानंतर 80 टक्के रुग्णांना दवाखान्यामध्ये दाखल करण्याची गरज पडलेली नाही हे आजवरच्या चाचण्यांमधून सिद्ध झाले आहे. हे इंजेक्शन दिल्यानंतर विषाणूंना शरीरातील पेशीमध्ये प्रवेश न करू देण्याचे काम या अँटीबॉडीज करतात असे त्यांनी सांगितले.
दरम्यान कोरोनाच्या पहिला लाटेपासून उपचारांमध्ये सातत्याने फेरबदल होत आहेत. तसेच पहिल्यावेळी केलेले उपचार दुसऱ्या वेळी निरर्थक ठरवले जात आहेत. अनेकदा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अगोदर प्रमाणित केलेली औषधे नंतर नियमबाह्य ठरवली गेली. अशा या आंधळ्या कोशिंबिरीच्या लढ्यात कोरोनावर मात करणे हेच रुग्णाचे नातेवाईकांचे आणि डॉक्टरांचे पहिले उद्दिष्ट ठरू लागले आहे. अशा परिस्थितीत नव्याने मोनॉक्लोनाल कॉकटेल अंटीबॉडीज या आशेचा किरण ठरल्या आहेत.











