दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : जिल्हयातील लॉकडाऊन शिथील झाल्याने तसेच पाचगणी-महाबळेश्वरचे पर्यटन काही अटींवर शिथील करण्यात आल्याने पर्यटक बाहेर पडू लागले आहेत. पाचगणी, महाबळेश्वर बरोबरच स्थानीक नागरिक व पर्यटक धोम धरणालाही पसंती देत असून अनेकजण पावसाची मजा लुटण्यासाठी धोम व परिसराला भेट देत आहेत.
गेली वर्षभर सुरू असलेल्या कोरोनाच्या महामारीने घरात कोंडून पडलेले अनेकजण लॉकडाऊन शिथील झाल्याने आता बाहेर पडू लागले आहेत. कंटाळा घालविण्यासाठी जवळपासच्या निसर्गरम्य ठिकाणाला ते पसंती देत आहेत. पाचगणी, महाबळेश्वरही नियमांसह पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्याने पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.
स्थानीक नागरिक जवळच असलेल्या धोम धरणावर फेरफटका मारताना दिसत आहेत. अनेक कुटुंबे येथे सहभोजनासाठी येत आहेत. तर युवकांचे ग्रुप एंजॉय करत पावसाचा व धरणाचा आनंद घेताना दिसून येत आहेत. धरण पसिरात गेले दोन दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली असून परिसरत हिरव्या दुलईने नटला आहे. आज दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. यामुळे अनेकांनी धोम धरणांस भेट दिली.
बोरी व येथील बोट क्लब अद्याप सुरू झाला नसल्याने पर्यटक पायीच भटकंती करणे पसंत करत आहेत. तर सहपरिवार आलेले पर्यटकही निवांतपणा अनुभवत आहेत. धोम धरणाच्या दोन्ही किनारी पर्यटकांची काहीअंशी गर्दी पहायला मिळत आहे.
कोरोना अजून जरी हद्दपार झाला नसला आणि शासन तिसर्या लाटेला थोपविण्याच्या तयारीत गर्क असले, तरीही पर्यटक मात्र आलेला कंटाळा घालविण्यासाठी धोम धरणावर मुक्त भटकत आहेत.











