माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक काम करणाऱ्या डॉरबिट फौंडेशनचे संस्थापक बिपिन श्रीवास्तव यांच्या संकल्पनेतुन कोविडच्या परिस्थितीत फौंडेशनच्या वतीने अन्नधान्य किट वाटपाचा निर्णय घेऊन नसरापूर परिसरातील गरजू कुटुंबांना किट वाटप करण्यात आले.
ही माहिती मिलिंद इंगुळकर यांनी दिली. नसरापूर ( ता. भोर ) येथील चेलाडी फाटा आदिवासी व परिसरात रोजंदारीवर काम करणाऱ्या ५३ कुटुंबांना या अन्नधान्य किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी भोरचे नायब तहसिलदार आर.टी. झाजरी, राजगड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मनोज नवसरे, डॉरबिट फौंडेशनचे सदस्य मिलिंद इंगुळकर, मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, नसरापूरच्या सरपंच रोहीणी शेटे, उपसरपंच गणेश दळवी, तलाठी जे.डी.बरकडे, भोर तालुका पत्रकार संघाचे किरण भदे, वैभव भुतकर, माणिक पवार, केंद्रप्रमुख शोभा समुद्रे, मुख्याध्यापिका मंगल खुटवड, वैशाली कांबळे, सागर खैरमोडे, सामाजिक कार्यकर्ते राजु मिठाले, सागर राशिनकर, आनंद इंगुळकर, अलका शेडगे आदी उपस्थित होते.
डॉरबिट फौंडेशनचे मिलिंद इंगुळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, फौंडेशनच्या वतीने पुढील काळात या भागातील शिक्षणासाठी काम करणार असून वंचितांचे शिक्षण थांबू नये यासाठी शिक्षणाला प्रोत्साहन देत सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन दिले जाणार असून आधुनिक शिक्षणासाठी परिसरातील शाळांना संगणक सुद्धा देण्यात येणार आहेत.
या उपक्रमासाठी डाँरबिट फौंडेशनचे राहुल टिळक, प्रिया गुप्ता, अस्लम धनानी, भवना कंदवाल, विनायक जरंडे यांनी सहकार्य केले. फौंडेशनचे संचालक इंद्रजित राँय यांनी या उपक्रमासाठी देणगी दिलेल्यांचे आभार व्यक्त करून देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी हातात हात घालुन पुढे आले पाहीजे असे आवाहन केले.
फौंडेशनचे कोअर कमिटी सदस्य आशिष राय यांनी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी फौंडशनच्या वतीने निश्चित कार्यक्रम राबवून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात विविध उपक्रमात अन्नधान्य किट वाटपासाठी सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते सागर राशिनकर, राजु मिठाले यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
नायब तहसिलदार झाजरी यांनी फौडेशनने राबवलेल्या या उपक्रमाचा प्रशंसा करुन त्यांच्या इतर सामाजिक उपक्रमासाठी प्रशासनाचे नेहमी सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. सरपंच रोहीणी शेटे यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत अन्नधान्य किट दिल्याने गरजूंना या अवघड परिस्थितीत मोठा आधार मिळाला असल्याने ग्रामपंचायतीच्या त्यांनी डाँरबिट फौंडेशनचे आभार मानले. उपसरपंच गणेश दळवी यांनी यावेळी सर्वाचे आभार मानले.











