आमदार यशवंत माने यांची माहिती
उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आमदार माने यांनी मानले आभार
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
मोहोळ मतदारसंघात शेतीच्या पाण्यासाठी वरदान ठरणारी महत्त्वपूर्ण योजना असलेली मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी ४० कोटी व उत्तर सोलापूर तालुक्यातील शिरापुर उपसा सिंचन योजनेसाठी ४० कोटी असा एकूण ८० कोटीचा निधी चालू अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती आमदार यशवंत माने यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या विशेष सहकार्याने व माजी आमदार राजन पाटील व जेष्ठ नेते जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ मतदारसंघातील शेतीच्या पाण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली मोहोळ तालुक्यातील आष्टी व सोलापूर तालुक्यातील शिरापुर उपसा सिंचन योजनेसाठी मिळून ८० कोटी चा निधी मंजूर केला आहे.
या योजनेसाठी मागील सन २०२०- २०२१ च्या आर्थिक अंदाजपत्रकात मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा योजनेसाठी ४० कोटी तर शिरापुर उपसा योजनेसाठी ३० कोटी असा ७० कोटी चा निधी मंजूर असून चालू बजेट मध्ये ८० कोटी चा निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन्ही उपसा योजनेसाठी १५० कोटी चा निधी मंजूर झाला असून मोहोळ मतदारसंघातील मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेती साठी वरदान ठरणारी योजना डिसेंबर २०२२ अखेर पूर्ण करण्याचा मानस असल्याची ग्वाही देखील आमदार यशवंत माने यांनी यावेळी दिली.
या योजनेसाठी निधी मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आमदार यशवंत माने यांनी आभार मानले.











