दारू पिऊन हातात शस्त्र घेऊन गावात दहशत करणाऱ्यास 14 दिवस कोठडी.. कर्जत पोलिसांची कारवाई..
कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक गावात विकास दिलीप शिंदे (वय 24 वर्ष) याने दारुच्या नशेत हातात धारदार शस्त्र घेऊन गावात नंगानाच केला. विनाकारण लोकांच्या अंगावर धावून जाणे, घरातील लोकांना मारहाण करणे अशाप्रकारची कृत्य तो करत असल्याने, कंटाळलेल्या गावाने पोलिसांकडे तक्रार केली आणि कर्जत पोलिसांनी त्याला चौदा दिवस पोलीस कोठडीची हवा शिकवली. अख्ख्या गावाला दाद न देणारा ‘राक्षस‘ राक्षसवाडीतून 14 दिवसांसाठी हद्दपार केल्याने राक्षसवाडीच्या नागरिकांनी मात्र पोलिसांचे आभार मानले.
राक्षस वाडी बुद्रुक गावातील विकास शिंदे यांनी गावातील लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरूच ठेवल्याने गावकरी वैतागले होते ग्रामस्थांनी अखेर कर्जत पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर त्यांच्या आदेशानुसार कर्जत पोलिसांनी विकास शिंदे याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. यात शिंदेला चौदा दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश कर्जतच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार सुनील माळशिकारे, भाऊसाहेब यमगर, विकास चंदन यांनी केली.











