जेजुरी : महान्यूज लाईव्ह
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत प्रसिद्ध देवस्थान जेजुरी खंडोबा (Jejuri Khandoba चरणी देवस्थानच्या विश्वस्त आणि त्यांच्या आईच्या स्मरणार्थ तब्बल अडीच किलो चांदीचा रत्नजडित हार (Silver Necklace) अर्पण केला.
हा हार खंडोबा देवस्थानचे विश्वस्त राजकुमार कांतीलाल लोढा यांनी अर्पण केला. त्यांच्या दिवंगत मातोश्री कमलाबाई लोढा यांच्या स्मरणार्थ हा हार अर्पण करण्यात आला. कमलाबाई यांचे सव्वा वर्षांपूर्वीच निधन झाले.
राजकुमार लोढा यांच्या मातोश्री कमलाबाई या जेजुरीच्या खंडोबाच्या भक्त होत्या. त्या भक्ति परायण असल्याने त्यांना धार्मिक कार्याची प्रचंड आवड होती. त्यांना खंडोबा चरणी रत्नजडित हार अर्पण करण्याची इच्छा होती आणि त्यासाठी खूप कालावधी पासून त्या पैसे साठवून ठेवत होत्या. या दरम्यानच्या काळात त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा हा प्रयत्न होता असे लोढा यांनी सांगितले.
सोमवारी कुलदैवत खंडेरायाची विधीपूर्वक पूजा केल्यानंतर लोढा कुटुंबीयांनी हा हार खंडेरायाला भक्तीभावाने अर्पण केला. राजस्थानातील कुशल कामगारांनी हा हार बनवला यावेळी राजकुमार लोढा यांच्या पत्नी विद्या, मुलगा सुमित हे उपस्थित होते.











