सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूरचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दोन दिवसांपूर्वीच आम्ही काही वाळूचोरांविरुद्ध कारवाई करणार आहोत असे सांगितले होते. त्यानंतर कार्यक्षेत्रातील नऊ कथित वाळूचोर हे पोलीस अटक करतील म्हणून पळून गेले आहेत. या वाळूचोरांसाठी पोलिसांनी एक फर्मान जारी केले आहे…! त्यामध्ये हे वाळूचोर जनावरांचे गोठे किंवा घराच्या ‘छप्परामध्ये’ लपून बसू शकतात आणि रात्री अपरात्री खाण्यासाठी मित्रांकडे किंवा आपल्याकडे येऊ शकतात.. त्यांना आधार देऊ नका. ते कदाचित कोरोना पॉझिटिव्ह सुद्धा असू शकतात..! अशी भिती घालून हे वाळूचोर आल्यास लगेच पोलिसांना संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
पोलिसांचे हे फर्मान धाडसी आहे, त्याचबरोबर लोकांना खुश करणारी आहे. या वाळू चोरांवर इंदापूर पोलिस मोठी कारवाई करणार आहेत. यामध्ये अक्षय नाईक (रा. अंबिका नगर), आबा देवकाते (रा. कांदलगाव), विशाल जगताप (रा. हिंगणगाव), दिपक रायकर (रा. माळवाडी), नागेश राखुंडे (रा. कांदळगाव), पांडुरंग झगडे (रा. तरडगाव), सतीश सोनवणे (रा. कांदलगाव), दिलीप भाळे (रा. खोरोची) आणि बार्शी तालुक्यातील पानगाव येथील लाला मोरे यांचा समावेश आहे.
या फर्मानाचे इंदापूर शहरात कौतुक होत आहे, त्याच वेळी गेल्या काही दिवसात इंदापूर पोलिसांनी केलेली कामगिरी लक्षात घेता, त्यांनी ‘परिंदा भी पर मार नही सकता’ अशा ठिकाणाहून देखील चोरांना शोधून काढले अशा परिस्थितीत दररोज तालुक्यात आणि शहरात दिसणारी ही नऊ जणांची टोळी पोलिसांना माहीत होणार नाही, यावर मात्र कोणाचा विश्वास बसत नाही. तुमचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यावरूनच इंदापूर शहरात वेगळीच कुजबुज सुरु झाली आहे.
पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांची धडाडी लक्षात घेता, अशा प्रकारच्या फर्मानाची इंदापूर पोलिसांना गरज नाही असेच वाटते, कारण संबंधित कोणीही कोठे लपलेला आहे, हे इंदापूर पोलिसांना लगेच समजू शकते. अशावेळी लोकांनी या नऊ जणांना घरात आश्रय देऊ नये म्हणून ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत अशी भीती दाखवणे कितपत योग्य आहे? असा सवाल देखील सध्या इंदापुरात विचारला जात आहे. त्यामुळे वास्तवातील चित्र देखील पोलिसांनी बदलण्याची गरज आहे. कारण या वाळूचोरांची माहिती कोणीही स्थानिक पोलिसांना देणार नाही. त्यामुळे भलेभले आरोपी जेरबंद करण्याची किमया करणाऱ्या इंदापूर पोलिसांना अशा फर्मानाची गरज नाही. त्यांच्या मनात आले तर अवघ्या काही तासात ते सर्व जणांना गजाआड करू शकतात हीच चर्चा सध्या शहरात सुरू आहे.











