माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – सर्वोच्च न्यायालयाची बंदी असतानाही बैलगाडा शर्यतींचे आयोजन करून वेल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगररांगावर बिनदिक्कतपणे शर्यत भरवली होती.. काही जण बैलगाडा पळवीत असल्याची खबर समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांची कुणकुण लागताच आयोजक आणि बैलगाडा मालकांनी पळ काढला. बैलगाड्यांनी पळ काढल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र काही जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी गर्दी जमा केल्याप्रकरणी दंडात्मक किरकोळ कारवाई केल्याचे समजते. याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा झडत आहे.
वेल्हा तालुक्यातील एका नामांकित रिसॉर्टच्या जवळ असलेल्या सुरवड गावच्या हद्दीत पहाटे बैलगाडा शर्यती पार पडल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच वेल्हा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी तातडीने पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
तोपर्यंत सहभागी बैलगाडा मालक आणि आयोजक यांनी पळ काढला. मात्र घटनास्थळी गर्दी केल्याप्रकरणी प्रमुख म्होरख्यासह दहा ते बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र कारवाई होऊ नये यासाठी राजकीय नेतेमंडळी प्रयत्न करत होते. दरम्यान पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी करून बैलांना निर्दयी वागणूक देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी प्राणीमित्र संघटनांनी केली आहे.
समजलेल्या माहितीनुसार, बैलगाडा शर्यतीबाबत राजगड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करण्याचे धोरण घेतल्याने बैलगाडा आयोजकांनी वेल्हा तालुक्यात शिरकाव केला आहे. सुरवड येथील हद्दीत डोंगर माळावर जवळपास ३० ते ३५ बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला असल्याची माहिती समोर येत असून घटनास्थळी पोलिस जाण्यापूर्वी शर्यतीच्या दोन फेऱ्यासुद्धा झाल्याची परिसरात चर्चा आहे.
दरम्यान पोलिसांनी मात्र अशा प्रकारचा कोणताही प्रकार घडल्याचे नाकारले. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी घटनास्थळी काही जणांनी गर्दी केली होती हे मान्य केले, परंतु यावेळी बैलगाडा शर्यत पार पडली नसल्याचे सांगितले.











