माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर : सध्या कोरानाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे अनेक कुटुंबाची ससेहोलपट होत असल्याचे स्थानिक पत्रकारांच्या माध्यमातून समजते. अशावेळी माणुसकी म्हणून अन्नदाते यांच्या माध्यमातून गरजूंना किराणा कीट वाटप करण्याचे उपक्रम स्तुत्य असून गरजूंच्या मदतीसाठी समाजातील दानशुरांनी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी केले.
राजगड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि नसरापूर ( ता. भोर ) येथील प्रतिष्ठीत व्यापारी सागर राशिनकर यांच्या वतीने स्थानिक पत्रकारांच्या पुढाकारातून राजगड पोलीस स्टेशनच्या आवारात मोफत किराणा कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक संदीप देशपांडे, सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, सागर प्रोव्हिजनचे मालक सागर राशिनकर, मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, तलाठी जे. डी. बरकडे, सहायक फौजदार ए.बी. खोमणे, हवालदार कुंडलिक माने, प्रमोद भोसले, संतोष तोडकर, संतोष दावलकर, अजित माने, भगीरथ घुले, सचिन भोसले, महिला पोलिस हेमा भुजबळ, सारिका इंगळे, तृप्ती लामटे, सामाजिक कार्यकर्ते संजय घाटे आदी उपस्थित होते.
राजगड पोलिस कर्मचारी आणि सागर राशीनकर यांच्या माध्यमातून स्थानिक पत्रकारांनी राबविलेले उपक्रम निश्चितच स्तुत्य असल्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी सांगितले. तर संकटात सापडलेल्या गरजू नागरीकांना नसरापूर परिसरात येथील कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या माध्यमातून मदत करता आली याचे निश्चितच समाधान मिळाले असल्याची भावना यावेळी सागर प्रोव्हिजनचे मालक सागर राशिनकर यांनी बोलून दाखवली.











