समाजकल्याणकडून प्रति लाभार्थी अडीच लाख रुपयांप्रमाणे नगरपालिकेस २ कोटी ३५ लाख!
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
रमाई आवास योजनेअंतर्गत इंदापूर नगरपरिषदेस सन् २०२०-२१ साठी एकूण ९४ लाभार्थींच्या यादीस मान्यता मिळालेली असून पुणे समाजकल्याण विभागाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रति लाभार्थी २ लाख ५० हजार रुपये प्रमाणे २ कोटी ३५ लाख रुपये रकमेचा धनादेश इंदापूर नगरपरिषदेस प्राप्त झाल्याची माहिती नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी दिली.
मागील तीन वर्षापासून रमाई आवास योजनेच्या लाभार्थी याबाबत सतत मागणी करत होते. नगरपरिषदेच्या वतीने लाभार्थ्यांना घरे मिळावी म्हणून सतत पाठपुरावा सुरू होता. इंदापूर नगरपरिषदेकडून एकूण १२२ लाभार्थ्यांची यादी मान्यतेसाठी समाज कल्याण विभागाकडे सादर करण्यात आलेली होती. समाज कल्याण विभागाच्या समितीच्या पाहणीनुसार ९४ लाभार्थी या घरकुलासाठी पात्र झाले असून त्यांना अनुदान प्राप्त झालेले आहे.
बांधकामाच्या प्रगतीपथावरील वस्तुस्थिती पाहून लाभार्थ्यांना नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने पाहणी केल्यावर टप्प्याटप्प्याने लाभार्यांस अनुदान वितरित करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी सांगितले.











