शिरूर : महान्युज लाइव्ह
शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावातील नागरिकांची होणारी गैरसोय आता थांबणार असून आरटीपीसीआर तपासणी केंद्र मांडवगण फराटा येथेच सुरू झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.
शिरूर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर शिरूर, कारेगाव या ठिकाणीच घशातील द्रव नमुने तपासणीसाठी सोय होती. या ठिकाणी जाण्यात वेळ, पैसा वाया आणि मनस्ताप होत होता. त्यातच चाचण्या देखील उशीरा झाल्याने काही नागरिकांना प्राणही गमवावे लागले.
पुर्व भागातील शिरसगाव काटा, पिंपळसुटी, इनामगाव, वडगाव रासाई, तांदळी, कुरुळी, कोळगाव डोळस आदी गावांची होणारी गैरसोय लक्षात घेत जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी मांडवगण फराटा येथेच आर टी पी सी आर तपासणी केंद्र व्हावे याबाबत पाठपुरावा सुरू केला होता.
अखेर मागणीची दखल घेत प्रशासनाच्या वतीने मांडवगण फराटा येथे नुकतेच आर टी पी सी आर तपासणी केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, डॉ.मंजुषा सातपुते व मांडवगण फराटा ग्रामस्थ उपस्थित होते.











