राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड, बारामती शहरासह दोन्ही तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज मुसळधार तसेच मध्यम सरी कोसळल्या. विजेच्या कडकटासह दमदार तर काही भागात रिमझिम स्वरुपात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. इंदापूर तालुक्यातही पश्चिम भागात व काही ठिकाणी मध्यम सरी कोसळल्या.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दौंड तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. आता जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने सुरुवात केली. आज दुपारी चार वाजता सुरू झालेला पाऊस साडेसात पर्यंत बारामती शहरात सुरू होता. सुरुवातीला मुसळधार व त्यानंतर मध्यम व हलक्या सरी कोसळल्या. मान्सूनच्या आगमनापूर्वीच पाऊस सुरु झाला आहे.
मागील तीन दिवसांपासून दौंड तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. मात्र आज बुधवारी ( दि.३ ) दुपारी तीन साडेतीन नंतर बारामती शहर व दौंडच्या पुर्व भागात भीमा नदीच्या पट्ट्यातील मलठण, राजेगाव, वाटलुज, लोणारवाडी, खानोटा या भागात विजेच्या कडकटासह मुसळधार पावसाने सुरुवात केली.
दौंड तालुक्यातील काळेवाडी, बोरीबेल, मळद, रावणगाव, खडकी, स्वामी चिंचोली, तर जिरेगाव, वासुंदे, कौठडी या दुष्काळी भागात ही चांगला पाऊस झाला तर पाटस आणि कुरकुंभ परिसरात रिमझिम स्वरुपात पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील काही भागात वादळी वारा आणि पावसाचे ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. बारामती शहरासह आजूबाजूच्या परिसरात ही चांगला पाऊस झाला.











