मुंबई : महान्यूज लाईव्ह
सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नंतर रद्द करण्यात आली. त्यानंतर आता महाराष्ट्रातील देखील बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकार घेण्याच्या स्थितीत आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. बारावीची परीक्षा रद्द करण्याबाबत आपत्तीव्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
कोरोना परिस्थितीत परीक्षा घेणे शक्य नसल्याने राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द होण्याचे संकेत शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. राज्य सरकारने बारावीची परीक्षा मे अखेर पर्यंत पुढे ढकलली होती. मात्र कोरोना चा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत बारावीची परीक्षा घेता येणार नाही, त्यातच केंद्र सरकारने देखील बारावीच्या परीक्षा सीबीएसई बोर्डाच्या रद्द केल्या आहेत.
मुलांचे आयुष्य धोक्यात घालू शकत नाही आणि मुलांची सुरक्षा व आरोग्य हीच आमची प्राथमिकता असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार देखील बारावीची परीक्षा रद्द करण्याच्या मनस्थितीत आहे.
दरम्यान दहावी परीक्षा रद्द करण्याचा नव्याने अध्यादेश जारी केल्यानंतर राज्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. राज्यात कोरोनाची स्थिती अजूनही धोकादायक असल्याने राज्य सरकारने नुकतीच या परीक्षा रद्द करण्याचा अध्यादेश नव्यानं जारी केला होता. त्यानंतर या याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाकडे मागितली होती. त्यावर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने ही परीक्षा का घ्यावी? यासंदर्भात याचिकेत मुद्दे उपस्थित करा अशी सूचना याचिकाकर्त्यांना केली आणि उद्या म्हणजे ३ जूनपर्यंत ही सुनावणी तहकूब केली आहे.











