युवराज जाधव : महान्यूज लाईव्ह
सांगली – जिल्ह्यातील सोनी विविध कार्यकारी सोसायटी चे कार्य आदर्शवत असून इतर सोसायटीने या सोसायटीचे आदर्श ठेवून वाटचाल करावी अगदी प्रतिकूल परिस्थितीत सोनी विकास सोसायटी ने जवळपास सत्तर लाखाचा नफा या वर्षी मिळवलेला आहे. विकास सोसायटीने इथून पुढे सक्षम होण्याचा प्रयत्न करून कामकाज करावे असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी सोनी येथे विकास सोसायटीच्या अमृत महोत्सव वर्षपुर्ती निमित्ताच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू पाटील तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनकर पाटील होते. सोनी येथील सोनी विकास कार्यकारी सोसायटीच्या यावर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत. या अमृतमहोत्सवी पुर्ती निमित्त एक छोटा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोरोनाचा चा काळा असल्याने कार्यक्रमात अगदी मोजक्याच मान्यवरांना आमंत्रित केले होते.
या कार्यक्रमात निळकंठ करे पुढे म्हणाले की, सोनी आणि परिसरात द्राक्षाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. द्राक्षाचे पीक हे तांत्रिक पीक आहे. द्राक्ष पिकवणे हे कौशल्याचे आणि जोखमीचे काम आहे. हे करत असताना शेतकऱ्यांनी पूर्ण विचार करून आणि आपले पूर्ण कौशल्य वापरून शेती करणे गरजेचे आहे. द्राक्ष शेती मोठी करण्यासाठी सोनी विकास सोसायटीचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. विकास सोसायट्यांमध्ये सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात, याचा फायदा घेऊन काम केल्यास सोसायटी सक्षमपणे उभा राहू शकते. सोनी विकास सोसायटीचे कार्य आदर्शवत आहे. केवळ मेहनत आणि कष्ट केल्यास सगळे शक्य होते, याचे उदाहरण सोनीकरांनी घालून दिले आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू पाटील म्हणाले की, सोसायटीला सक्षम करून गावचा विकास करायचा असेल, तर सोसायटीच्या माध्यमातून घेतलेले कर्ज नियमित भरण्याची सवय कर्जदारांना लावली पाहिजे. तरच कर्जदार व विकास सोसायटी दोन्ही ही सक्षम होतील. शंभर टक्के वसुली झाल्यास विविध सवलती विविध लाभ असतात ते घेता येतील. २००९ ते २०१३ या काळात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काम करत असताना सोनी सोसायटीचे कार्य हे फारसेे चांंगले नव्हते, पण त्या नंतरच्या काळामध्ये सोनी विकास सोसायटी ने चांगली प्रगती केल्याचे दिसून येते. सोनी विकास सोसायटीने ८९ टक्के वसुली केली आहे. शंभर टक्के वसुली झालेल्या संस्थाना विविध योजनांचा लाभ मिळतो.
प्रास्ताविकात बोलताना सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील म्हणाले म्हणाले की, २४ मे १९४६ रोजी क्रांतिवीर दत्ताजीराव पाटील यांच्या पुढाकाराने सोनी विकास सोसायटीची स्थापना करण्यात आली. १९७४ पासून विकास सोसायटी स्वतःच्या इमारतीत कामकाज करत आहे. सोसायटीच्या माध्यमातून यावर्षी २१ कोटी रूपये कर्जपुरवठा करण्यात आला असून, सोनी विकास सोसायटी द्वारे परिसरात सध्या असलेल्या द्राक्षबागेच्या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला जातो. यावर्षी विकास सोसायटीला ढोबळमानाने ७० लाख रुपये नफा झालेला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विकास सोसायटीचे कामकाज केले जात होते, पण सभासदांमध्ये झालेल्या जागृतीमुळे आणि सभासदांनी दिलेल्या प्रतिसादामुळे कोणतेही राजकारण न करता संस्थेचे हित लक्षात घेऊन काम केल्याने हे सगळे शक्य झाले.
यावेळी संजय माने, अंकुश पाटील, जयसिंग चव्हाण, सयाजी पाटील, उल्हास माळकर, पंचायत समिती सदस्य रंगराव जाधव यांची भाषणे झाली या कार्यक्रमासाठी विकास सोसायटीचे अध्यक्ष किरण माळी, व्हाईस चेअरमन वैशाली पाटील, पंचायत समिती सदस्य रंगराव जाधव, बाजार समितीचे संचालक माजी उपसभापती जीवन पाटील, सयाजी पाटील, उल्हास माळकर, माजी सरपंच सुरेश मुळीक, विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव, संजय माने, जयसिंग यादव, अंकुश पाटील, उपसरपंच श्रीकांत जाधव, महादेव पाटील, पंडित पाटील, अरविंद पाटील, डीपी पाटील, जयसिंग चव्हाण, माजी सरपंच शामजी ढोबळे, चार्ली ढोबळे यांच्यासह संचालक, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.











