माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – उपविभागीय पोलीस कार्यालय, राजगड पोलीस स्टेशन, नसरापूर मंडलाधिकारी कार्यालय एकाच छताखाली होण्यासाठी चेलाडी येथील वापरात नसलेली बसस्थानकांची जागा परिवहन खात्याकडून गृह खात्याकडे स्थानांतरित होण्यासाठी सरकारकडे प्रयन्त सुरु असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली आहे.
राजगड पोलीस स्टेशन प्रशासकीय कामकाजासाठी पुणे – सातारा महामार्गावरील चेलाडी ( ता. भोर ) येथील बंद अवस्थेत असलेल्या बसस्थानकाची जागा वर्ग होण्यासाठी प्रलंबित मागणी पुन्हा होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम थोपटे यांनी इमारत आणि आवाराची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील, राजगड ठाण्याचे पोलीस अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, उपसभापती लहुनाना शेलार, नसरापूर ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, अनेक वर्षापासून वापराविना बंद असलेल्या चेलाडी बसस्थानकांची जागा राजगड पोलीस ठाण्याच्या वापरासाठी वर्ग करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि राजगड ठाण्याचे तत्कालीन पोलीस अधिकारी यांनी सतत पाठपुरावा केला आहे.
आमदार संग्राम थोपटे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, राजगड पोलीस ठाणे आणि मंडलाधिकारी कार्यालयसाठी बसस्थानकाची जागा वर्ग होण्यासाठी स्वतः राज्य सरकारकडे वेळोवेळी पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे. मात्र तांत्रिकदृष्ट्या परिवहन खात्याकडून जागा मिळण्यास अडचण आलेली असून परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे.
कोरोनाचा कालावधी कमी झाल्यानंतर बसस्थानकाची जागा वर्ग होण्यासाठी अधिक गतीने पाठपुरावा करणार असल्याचे थोपटे यांनी माहिती दिली. तर पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी म्हणाले की, पोलिस स्टेशनला जागा कमी असल्याने अनेक समस्या निर्माण होत असून पोलिस स्टेशनसाठी ही जागा मिळाल्यास पोलिसांच्या सर्व समस्या दूर होतील. यासाठी पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे घोरपडे यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या उड्डाणपूल झाल्याने या बसस्थानकाचा उपयोग होणार नाही. गृह खात्याकडे ही जागा वर्ग झाल्यास राजगड पोलिसांच्या अनेक समस्या सुटणार आहेत. विशेष म्हणजे महामार्ग जवळ असल्याने घातपात झाल्यास पोलिसांना घटनास्थळी वेळेवर पोहचता येईल. तसेच पोलीस ठाण्याची अद्यावत इमारत झाल्यास पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना निवासाची व्यवस्था होईल. तसेच जप्त केलेल्या वाहने, आरोपी ठेवण्यासाठी पोलीस कोठडी अन्य सुविधा उपलब्ध होणार असून तातडीने येथील जागा वर्ग करण्याची मागणी होत आहे.











