दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : सातारा पुणे महामार्गावरील हॉटेलिंग हब असलेल्या वेळे गावाला कोरोनाचा जबरदस्त विळखा बसला. कोरोनाच्या महा मारीत गावातील बारा जणांना जग सोडून जावे लागले. या अनपेक्षित आणि अचानक आलेल्या संकटाने संपूर्ण गाव भयभीत झाले.
यातून गावाला सुस्थिर करण्यासाठी आणि कोरोना पासून सुरक्षित करण्यासाठी युवकांनी कंबर कसली आणि गावातील रणसंग्राम मित्रपरिवार आणि पिंजरा कला केंद्रातील कलाकारांना बरोबर घेऊन युवकांनी गावातील सर्व कुटुंबांना सॅनिटायझर आणि मास्क चे वाटप केले.
केवळ मास्क आणि सॅनिटायझर वाटप करून गावातून कोरोनाला अटकाव होणार नाही, हे जरी खरे असले तरी, या महामारीच्या काळात गावकरी आपल्या सोबत आहेत आणि संपूर्ण गाव हातात हात घालून कोरोनाचा सामना करेल हा विश्वास मात्र युवकांनी त्यांच्या कृतीतून गावातील सर्व कुटुंबांना दिला.
यावेळी अशोक ननावरे, माजी सरपंच दशरथ पवार, रमेश पवार, विश्वास कोथळे गुरुजी, सागर भोसले, राजेश पवार, आनंद लोखंडे, शरद पवार, जितेंद्र पवार, विनोद लोखंडे, शत्रुघ्न पवार, संदीप पवार, गणेश नलावडे,अनिल नलावडे, अनुप ढमाळ, सुनिल पवार, विकास पवार, रुपेश पवार, विधात सोनवणे यांच्यासह पिंजरा कला केंद्रामधील सर्वांनी एकत्र येऊन गावातील घराघरांमध्ये सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले.
आता प्रशासनाच्या आदेशाची वाट न पाहता आपली काळजी आपणच घेऊन आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला आपणच वाचू या अशी प्रतिज्ञा प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. असे आवाहन रणसंग्राम मित्रपरिवार आणि पिंजरा कला केंद्रातील कलाकारांनी केले. या स्तुत्य उपक्रमाचे वेळे ग्रामस्थांनी कौतुक केले.











