दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : वाई वनपरिक्षेत्राचे अधिकारी, कर्मचारी वाई ते सुरुर रस्त्याने गस्त घालीत असताना रात्री ८.३० वाजणेच्या सुमारास शहाबाग गावच्या हद्दीत टाटा कंपनीच्या टेम्पोमधुन चोरट्या पध्दतीने लाकडाची वाहतुक करताना लाकडासह टेम्पो चालकाला ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ३ लाख १५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी महेश झांजुर्णे यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वनअधिकारी रस्त्याने गस्त घालत असताना शहाबाग फाटा येथे रात्रीच्या सुमारास टेम्पो (क्र. MH.११.M.५१०३) या वाहनाची तपासणी केली असता, सदर वाहनात आंबा, लिंब, रामफळ, चिंच, उंबर इत्यादी जातीचा अनगड, गोलटा, इमारती व जळावू लाकुडमाल विनापरवाना वाहतूक करताना मिळून आला.
टेम्पोचालक राजेंद्र नाथ्याबा नेवसे (रा. नायगांव, ता. खंडाळा, जि. सातारा) याचेकडे सदर लाकुडमालाचा वाहतूक पास नसल्याने त्याचेवर भारतीय वनअधिनियम, १९२७ चे कलम ४१,(२), (ब) अन्वये वनरक्षक वाई यांनी वनगुन्हा नोंद केला. टेम्पो (क्रमांक MH.११.M.५१०३) हा लाकूड मालासह जप्त करण्यात आला. सदर
गुन्ह्यात ३ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई सातारा उपवनसंरक्षक एम. एन. मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) व्ही. एन. गोसावी, यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी महेश झांजुर्णे, वनरक्षक वाई वैभव शिंदे, बोपर्डीचे वनरक्षक वसंत गवारी, वनसेवक सुरेश सपकाळ यांनी सहभाग घेतला.










