दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील केडगाव येथील ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामपंचायत कार्यालयातील एका रूममध्ये अंगणवाडी सेविका व शिक्षकांची बैठक घेतली. मात्र या बैठकीत खबरदारी व दक्षता म्हणून सोशलडिस्टींगचे पालन केले नसल्याचे चित्र होते. सोशलडिस्टींग आणि नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणारे प्रशासन आता खुद्द ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनीच नियम धाब्यावर बसवल्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई करणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कोरोना प्रादुर्भाव आणि कोरोना बाधीत रूग्णांची वाढती साखळी तोडण्यासाठी तालुका प्रशासनाने कडक पावले उचललेली आहेत. घरोघरी जावून आरोग्य तपासणी करण्याची जबाबदारी शासनाने अंगणवाडी सेवीका आणि शिक्षकांवर सोपवली आहे. स्थानिक पातळीवरील आरोग्य विभाग, ग्रामपंचायत समिती व दक्षता समिती यांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
हे करीत असताना स्थानिक प्रशासनानेही नियमांचे पालन करणे, खबरदारी घेणे ही तितकेच गरजेचे आहे. ती त्यांची जबाबदारी आहे. मात्र केडगाव ग्रामपंचायत प्रशासनाने कार्यलायत नुकतीच अंगणवाडी आणि शिक्षकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यामुळे बैठकीस परिसरातील अंगणवाडी सेविका आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही बैठक घेत असताना ग्रामपंचायत प्रशासनाने मोकळ्या जागेत ही बैठक घेणे आवश्यक होते. बैठकीत ठराविक अंतर ठेवून बैठक व्यवस्था करणे आवश्यक होते. जास्त गर्दी होणार नाही याची दक्षता ही ग्रामपंचायत प्रशासनाने घेण्याची आवश्यकता होती. मात्र या बैठकीत कोणतीच खबरदारी घेण्यात आली नसल्याचे चित्र उपस्थितांना पहावयास मिळाले.
सोशल डिस्टंसिंग नियमांचे सर्रास पणे उल्लघंन या बैठकीत केल्याचे चित्र होते. परिणामी या बैठकीत उपस्थित असलेल्या पैकी काही जण कोरोना बाधीत असल्यास त्यांचा संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्यास यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर प्रशासन दंडात्मक तसेच गुन्हे दाखल करून कारवाई करीत आहेत. मग आता केडगाव ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित अधिकारी यांच्यावरही दौंड तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.











