शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यात कोरोना बाधित आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. शिरूर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांत कोरोना बाधितांची वाढणारी संख्या चिंताजनक होती. त्याचप्रमाणे शिरूर शहरापेक्षा ग्रामीण भागात आढळणाऱ्या रुग्णांची ही संख्या मोठी होती.
रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून लॉक डाऊन बाबत काटेकोरपणे नियोजन करण्यात येत आहे. सौम्य लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींसाठी शिरूर तालुक्यात सीटी बोरा महाविद्यालय, मलठण, मांडवगण फराटा, उरळगाव, कोंढापुरी, पाबळ आदी ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आली आहेत.
इतरांना शिरूर ग्रामीण रुग्णालय, न्हावरे ग्रामीण रुग्णालय यांसह विविध खासगी दवाखान्यात कोविड वर उपचार केले जात आहे. शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, जिल्हा परीषद सदस्या सुजाता पवार या रावलक्ष्मी ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांना अधिक चांगल्या सोयी सुविधा मिळाव्या यासाठी प्रयत्न करत असून रुग्णांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने केलेल्या उपाययोजना यामुळे अपेक्षित परिणाम दिसून येत असून गुरुवार दिनांक २० मे रोजी शिरूर तालुक्यात नवे १३५ रुग्ण तर नगरपरिषद हद्दीत १५ रुग्ण आढळून आले. तालुक्यात २५६ रुग्ण बरे झाले तर नगरपरिषद हद्दीत ३५ रुग्ण बरे झाले आहे.नगरपरिषद हद्दीत व ग्रामीण मध्ये मिळून केवळ दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शिरूर तालुक्यात नव्याने कोरोना बाधित होणारी रुग्णसंख्या उतरंडीला लागलेली पहावयास मिळत असून तालुक्यासाठी निश्चितच समाधानाची बाब आहे. नागरिकांनी ही लक्षणे आढळून आल्यास त्वरित तपासणी करून उपचार घेतल्यास लवकरच रूग्णसंख्या आटोक्यात येऊ शकते असे उपचार करणाऱ्या काही डॉक्टरांनी बोलताना सांगितले.











