बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील मोढवे परिसरातील खडी क्रशर बंद करण्यात यावे यासाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला होता. त्याची दखल महाराष्ट्र प्रदूषण प्राधिकरणाने घेतली असून (चौधरवाडी ता. बारामती) येथील स्टोन क्रशरला प्रदूषण विभागाने दणका दिला आहे, खडी क्रशर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत व दोन स्टोन खडी क्रशर मालकांना पुढील सात दिवसांमध्ये आपले म्हणणे मांडावे अशी नोटीस बजावली आहे.
याबाबत ताशेरे ही ओढले आहेत. जिल्ह्यातील गौण खनिज खणी कर्म विभागाने देखील याची दखल घेतली असून बारामती तसेच पुरंदर तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडून अहवाल मागितला आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दौंड तालुक्याचे निरीक्षक बापुराव सोलनकर व माणिक काळे यांनी सांगितले. या दोघांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.
यावेळी सोलनकर म्हणाले की, मोढवे परिसरातील शेतकऱ्यांचे ग्रामस्थांचे यात खूप मोठे नुकसान झाले आहे. शेतीतील पिकांचे नुकसान, सुरुंगामुळे घरांना, मंदिरांना तडे गेलेले आहेत, तसेच मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्यामुळे पाण्याची पातळी खाली जाऊन विहिरी कोरड्या पडायला लागल्या आहेत. त्यामुळे येथे धूळ मोठ्या प्रमाणात उडत आहे. त्यामुळे तेथील लोकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या खडी क्राशरवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
सोलनकर म्हणाले की एका क्रशर वर कारवाई झाली, हे मोढवे येथील ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकजुटीचा विजय आहे. अजून दोन खडी क्रशरवर कारवाई झाली पाहिजे. जोपर्यंत हे दोन्ही क्रशर बंद होत नाहीत, तो पर्यंत हा आंदोलनाचा लढा थांबणार नाही.
दरम्यान प्रदूषण नियामक मंडळाने खडी क्रशर बंद करण्याचे आदेश महावितरणला कळवले असूनही निरा (ता.पुरंदर) येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांना वरिष्ठ कार्यालयाकडून वीज तोडू नका असे सांगितले गेले. मात्र जर लवकरात लवकर कार्यवाही केली नाही, तर आंदोलन करण्यात येईल असे तक्रारदार बापुराव सोलनकर व माणिक काळे यांनी सांगितले.










