इंदापूर : महान्यूज लाईव्ह
सोमवारी १७ मे च्या मध्यरात्रीपासून इंदापूर तालुक्यात यापूर्वी १० मे पासून लावण्यात आलेल्या कडक लाॅकडाऊनचे निर्बंध उठवण्यात येणार आहेत. मात्र महाराष्ट्र शासनाने जाहिर केलेल्या ३१ मे पर्यंतच्या लाॅकडाऊनचे नियम मात्र कायम राहतील. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा साठीच नागरिकांनी बाहेर पडावे असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
इंदापूर तालूक्यासाठी १० मे रोजी करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनमध्ये १७ मे च्या मध्यरात्रीपासून थोडी शिथीलता आणण्यात येणार असल्याचे सांगत या काळात नागरिकांनी गर्दी न करता फक्त अत्यावश्यक कामासाठीच सकाळी अकरा वाजेपर्यंतच घराबाहेर पडावे, असे आवाहन सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
इंदापूरात तालुक्यातील कोरोना स्थिती बाबत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार अनिल ठोंबरे, प्रभारी पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, जीवन माने, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, कोरोना नियंत्रण अधिकारी डाॅ.प्रशांत महाजन, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.सुनिल गावडे, नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले की, इंदापूर तालुक्यात कडक निर्बंधाच्या लाॅकडाऊनमध्ये कोरोना बाधितांची संख्या काही प्रमाणात नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र पुढील काळात गाफील न राहता गर्दी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. आठ दिवसाचा लाॅकडाऊन संपल्यानंतर नागरिक भाजीपाला, किराणा खरेदीसाठी गर्दी करतील. ते टाळण्यासाठी योग्य जागेची निवड करुन सुरक्षित अंतर ठेऊन खबरदारी घेणे गरजेचे आहे.
जिथे गर्दी होईल त्या दुकानदारावर थेट गुन्हे दाखल करा असा आदेश त्यांनी प्रशासनाला दिला. इंदापूर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या सोईसाठी पुरेशा बेड उपलब्ध आहेत. औषध पुरवठा देखील व्यवस्थित असल्याचे त्यांनी सांगितले.
तिसऱ्या लाटेतील संभाव्य नुकसानीचा आढावा! लहान मुलांसाठी दवाखान्याची तयारी!
राज्यमंत्री भरणे म्हणाले की, कोरोनाची तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन नियोजन करावे लागणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. यात लहान मुलांना अधिक धोका असल्याचे तज्ञांचे म्हणने आहे. त्यानुसार इंदापूर तालुक्यात ० ते ११ वयोगटातील १ लाख ३ हजार बालके आहेत. यासाठी १५ बालरोग तज्ञांसह एक समिती गठीत करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उपजिल्हा रूग्णालयात यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्याच्या सुचना भरणे यांनी केल्या आहेत. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनीही प्रशासकीय अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.











