राजेंद्र झेंडे : महान्युज लाईव्ह
दौंड : मागील महिन्यात दौंड तालुक्यातील उंडवडी, सौंदडवाडी परिसरात शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन दिसल्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील देवकरवाडी येथील मेंढपाळ संपत सोमा थोरात व दादा सोमा थोरात या मेंढापाळाच्या पालावर दोन ते तीन बिबट्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात शेळ्या, मेंढ्यांना लक्ष्य केले. या हल्ल्यात पालातील 9 शेळ्या व 1 मेंढी ठार झाल्या.
मिरवडी येथील मेंढपाळ थोरात यांचा मेंढ्याचा कळप देवकरवाडी येथील मगरवाडी परिसरात मुक्कामी होता. शनिवारी (दि.15 ) रात्रीच्या सुमारास बिबट्यांनी मेंढपाळ च्या पालावर हल्ला चढवला, यामधील सात शेळ्या बिबट्यांनी शेजारील शेतात फरफटत नेले. तसेच दोन शेळ्या व एक मेंढी कळपातच ठार केली.
यामध्ये सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले .या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपाल जी.एम. पवार, वनरक्षक शिवकुमार बोंबले, नाना चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेची माहिती घेत पंचनामा केला. सरपंच सागर शेलार व माजी सरपंच बाळासाहेब शिंदे यांनीही याठिकाणी भेट दिली. वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा बसवण्याची मागणी केली.
या घटनेत थोरात कुटुंबीयांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. दरम्यान, वनविभागाने याभागात पिंजरा लावुन बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागील काही दिवसांपासून राहू बेट भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. उसाच्या शेतात बिबट्या ठाण मांडून आहे. यामुळे शेतात काम करण्यासाठी जाण्यासाठी शेतकरी घाबरत आहेत.











