विशाल कदम:- महान्यूज लाईव्ह
उरुळी कांचन : शहराप्रमाणेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शन ची गरज लागत आहे. या अनुषंगाने श्री प्रयागधाम हॉस्पिटलमध्ये लवकरच ऑक्सीजन बेड उपलब्ध करून देऊ. असे आश्वासन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत सभाग्रहात शनिवारी (ता. १५) आढावा बैठक झाली. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आश्वासन दिले. यावेळी हवेलीचे तहसीलदार विजयकुमार चोबे, आरोग्य अधिकारी सचिन खरात, गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के, जिल्हा परिषदेच्या सदस्या किर्ती कांचन, पंचायत समितीच्या सदस्य हेमलता बडेकर आणि पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन उपस्थित होते.
यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रतीबंधानात्मक उपाययोजना चांगल्या प्रकारे सुरु आहेत. यामुळे रुग्णांच्या संख्येत घट होत चालली आहे. सध्या रुग्णांना ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड व रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होत आहे. रेमडेसिव्हीरच्या एका इंजेक्शनची सुमारे ९५० रुपये तर दुसऱ्या इंजेक्शनची १४०० रुपये किंमत आहे. जर यापेक्षा जास्त किंमतीने कोणी
इंजेक्शन विकले, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच नागरिकांच्या समस्या त्वरित सोडविण्यावर भर दिला आहे.
यावेळी उपसरपंच संचिता कांचन, भाऊसाहेब कांचन, राजेंद्र कांचन, प्रियंका कांचन, अजिंक्य कांचन, सीमा कांचन, सुभाष बगाडे, बाबासाहेब तांबे, सागर कांचन, शंकर बडेकर, जितेंद्र बडेकर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. संचेता कदम व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
दरम्यान, खासदार डॉ. कोल्हे यांनी कोरेगाव मूळ येथील कोव्हीड सेंटर व उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. तसेच त्यांनी कोरोना रुग्णांशी बोलून त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. तसेच त्यांनी उरळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. आणि कोरोना रुग्णांची दिवसरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस व आरोग्य कर्मचारी यांना प्रोत्साहन दिले.
खासदारांकडे करण्यात आल्या मागण्या
कोरोना रुग्णांची लवकरात लवकर चाचणी होऊन त्यांना एचआरसीटी तपासणीसाठी लोणी काळभोर या ठिकाणी जावे लागते. या टेस्टद्वारे रुग्णांना कोरोनाचा स्कोअर समजला जातो. यामुळे उरुळी कांचन येथील नागरिकांसाठी एक एचआरसीटी केंद्र उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती कांचन यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना केली आहे
संत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग हा उरळीकांचन गावातून जात आहे. या रस्त्याचा पालखी महामार्ग मध्ये समाविष्ट करून रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात यावे. तसेच उरुळी कांचन ग्राम सचिवालयासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सरपंच संतोष उर्फ पप्पू कांचन यांनी केली.
खाजगी दवाखाने कोरोना रुग्णांच्या उपचाराच्या नावाखाली नातेवाइकांकडून जास्त पैसे घेत आहेत. अशा खाजगी दवाखान्यांवर प्रशासनाच्या वतीने ऑडिट करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य संतोष कांचन यांनी केली.











