लॉकडावून असेपर्यंत नाष्टा दिला जाणार – तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत यांची माहिती
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर इंदापूर तालुका सात दिवस कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. अशात इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात व त्याच भागात असणा-या इतर खाजगी दवाखान्यात कोरोनाचे रुग्ण ॲडमिट केले आहेत.
या वेळी कोरोना बाधित रूग्णांना औषधोपचाराच्या गोळ्या देण्यासाठी किंवा कोरोना बाधित रूग्णांना दाखल करणे व सोडण्यावेळी नातेवाईक हे रूग्णालय परिसरातच थांबत आहेत. इंदापुर शहरात सध्या कडक लॉकडाउन असल्यामुळे त्या सर्वांचे घरून डबा घेऊन येईपर्यंत उपासमार होत असल्याचे लक्षात येताच कोरोना बाधित रूग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देत सामाजिक दृष्टीकोनातून इंदापूर तालूका काँग्रेस पक्षाच्या वतीने गोरगरीब नातेवाईकांना दवाखान्याच्या चौकात नाष्टा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या सूचनेनुसार इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दररोज ३०० लोकांची नाष्ट्याची व्यवस्था केली आहे. इंदापुरात कडक लॉकडाऊन असेपर्यंत ही सेवा चालू राहणार आहे अशी माहिती इंदापूर तालूका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी दिली.
इंदापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चमनभाई बागवान, पुणे जिल्हा सरचिटणीस जाकिरभाई काझी, खजिनदार भगवान पासगे, निवास शेळके, सुफियानखान जमादार आदी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ही सेवा चालू आहे अशी माहिती काँग्रेसचे तालुका अध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी दिली.











