संपादकीय
भाजप शासित राज्यातील कोणीतरी मुख्यमंत्री दोन दिवसापूर्वी म्हणून गेला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भिकारी आहेत. सतत केंद्राकडे भीक मागत असतात. हो! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भीक मागतात, कारण तुमच्या पक्षाची केंद्र सरकार मध्ये असलेली सत्ता ही एकांगी, अहंकारी आणि मिजास असलेली सत्ता आहे. ज्या ठिकाणी आपली सत्ता नाही, तिथले लोकही आपले नाहीत अशी धारणा मनात ठेवणाऱ्या ठेवणाऱ्या अहंकारी राजाची जिथे सत्ता आहे, तिथे भीक मागूनच आपल्या लोकांसाठी मदत मागून घ्यावी लागते, कारण हे संघराज्य आहे म्हणून!
महाराष्ट्रातील एकही सामान्य माणूस उपचाराविना आणि अंत्यसंस्काराविना राहता कामा नये, किमान एवढी तरी सध्याच्या जागतिक महामारीच्या संकटामध्ये माणुसकीची धारणा आहे. इथे प्रत्येकाची तपासणी होते आणि प्रत्येक कोरोना बाधिताची नोंद घेतली जाते. आज उत्तर प्रदेश, बिहार मधील परिस्थिती पाहिली तर भयावह असल्याचे रिपोर्ट युनिसेफ कडून संपूर्ण जगाला जात आहेत. आता जर भारताची मदत केली नाही, तर संपूर्ण जगासाठी ही धोक्याची घंटा असेल असे म्हटले आहे. त्याला एकमेव कारण आहे, गंगा नदी मध्ये वाहत चाललेले मृतदेह!
उन्नाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात नदीकाठी दफन करणाऱ्या मृतदेहांच्या बाबतीत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र या जिल्हाधिकार्यांना या जिल्ह्यांमध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकडे उपलब्ध करून देण्याची सूचू नये, हे कशाचे लक्षण आहे? ही कसली चाणक्यनीती आहे? मृतांचे आकडे लपवण्यात कसली रामराज्याची नीती आहे? ज्या राज्याचा मुख्यमंत्री आमच्याकडे ‘कोरोना ना के बराबर’ आहे असे म्हणतो, त्या राज्यांमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये गंगा नदीत शेकडो मृतदेह वहात जातात ही कोणत्या प्रकारची डोळ्यावर पट्टी बांधलेली राजनीती आहे? त्या तुलनेत महाराष्ट्र कितीतरी चांगला आहे असेच म्हणावे लागेल.
इथे थोडे काही खुट्ट झाले की इथलेच भाजपवाले आकाश-पाताळ एक करतात. तेच भाजपवाले मात्र गुजरातमधल्या आगीच्या घटनासंदर्भात, उत्तर प्रदेश मधल्या मृतदेहांच्या स्थितीबाबत अवाक्षरही तोंडातून काढत नाहीत. ही कोणती माणुसकी आहे? प्रत्येक गोष्टीत राजकारण करायची सवय झालेल्यांना कसे समजून सांगायचे?
राजा नागडा असला की, वजीर देखील त्याच स्वरूपाचा असतो. उन्नावचे जिल्हाधिकारी रविंद्र कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना बक्सर मध्ये गंगा किनाऱ्यावर मृतदेह दफन केले जात आहेत अशी माहिती मिळाली असून, यासंदर्भात आम्ही काही चुकीचं घडल्याचे दिसल्यास कायदेशीर कारवाई करणार आहोत. काही मृतदेहावरील वाळू वाहून गेल्यामुळे ते उघडे पडले आहेत असेही दिसून येत असले, तरी केवळ मृतदेह आहेत म्हणून त्यांना कोरण्याचा संसर्ग झाला आहे असे म्हणता येणार नाही अशी स्पष्टोक्ती केली आहे.
दैनिक भास्कर समूहाच्या पत्रकारांनी 27 जिल्ह्यांमध्ये गंगेच्या किनारी जाऊन माहिती घेतली, तेव्हा 1140 किलोमीटरच्या अंतरात 2 हजार पेक्षा अधिक मृतदेह असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कानपूर, उंनाव, गाजीपुर, बलिया आदी ठिकाणची परिस्थिती जास्त खराब असल्याची माहिती देखील या वृत्तसमूहाने दिली आहे.
संपूर्ण देशात कुंभमेळ्यामुळे झालेल्या कोरोना च्या विस्फोटाची चर्चा होत असताना भाजपचे तथाकथित सत्ताधारी मात्र डोळ्यावर झापड लावून बसलेले आहेत. भाजपच्या आयटी सेल ने मागील वर्षीच्या कोरोनाच्या पहिला लाटेमध्ये निजामुद्दीन येथे झालेल्या मुस्लिम समाजाच्या सामूहिक कार्यक्रमादरम्यान कोरोनाचे तीनशे रुग्ण एकाच इमारतीत आढळल्यानंतर जो गजहब केला होता, तो गजहब आता कुंभमेळ्याच्या दरम्यान दिसला नाही, उलट कुंभमेळा कसा व्यवस्थित आहे, कुंभमेळा च्या ठिकाणी कसा कोरोना होत नाही अशा स्वरूपाच्या पोस्ट जास्तीत जास्त फिरवून लोकांचा संभ्रम निर्माण करण्यात आला.
परंतु कोरोनाने कोणताही रोग जात आणि धर्म पाहत नसतो हे यातून दाखवून दिले आणि गावागावात अंत्यसंस्काराच्या चिता जळू लागल्या. तरीदेखील आमच्या राज्यांमध्ये ‘कोरोना ना के बराबर है’ असे म्हणणारा मुख्यमंत्री या संबंध देशाने पाहिला. वास्तविक पाहता पहिल्या लाटेदरम्यान आढळलेले तीनशे कोरोनाग्रस्त मुस्लीम हे एकाच ठिकाणी आढळले आणि त्यांच्यावर वेळेत उपचार झाले, परंतु त्यांचे संपर्क देखील माहीत झाले होते. परंतु आता कुंभमेळ्यातून गेलेल्यांचे बहुतांश संपर्क क्रमांक मिळाले नाहीत आणि त्यातून फैलाव होत राहिला आणि तो फैलाव गावेच्या गावे महामारी च्या भक्षस्थानी पाडणारा ठरला. यात कोण जग सोडून गेले?..हिंदूही आहेत ना त्यात?
सध्या देशामध्ये जे मृत्यू होत आहेत, ते मृत्यू आणि वास्तवातील मृत्यूच्या आकडेवारी ही भयावह आहे. वास्तविक पाहता अगदी महाराष्ट्रासकट दिल्ली, गुजरात आणि एकूणच सर्व राज्यांमध्ये कोरोनाचे जे रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत, त्यांची संख्या व सरकारी आकडे यामध्ये प्रचंड तफावत आहे. एकूण अंत्यसंस्कार केलेल्या मृतांची संख्या आणि सरकार सांगत असलेल्या मृतांची संख्या यामध्ये अगदी दुपटीने फरक आहे. अशी स्थिती असताना देखील जी आकडेवारी भारत सरकार दाखवत आहेत तीदेखील जगाच्या एकूण मृतांच्या 25% पर्यंत पोचले आहे तर जगातील एकूण कोरणा बाधितांच्या संख्येच्या 46 टक्के पर्यंत एकटा भारत पोहोचलेला आहे.
अशाही स्थितीत राजकारणाचे निर्लज्ज डांगोरे पिटत राजकारणी लोक आपली पोळी भाजत आहेत. लोकांनी याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, परंतु आपले मेंदू जर आपण निर्बुद्धांच्या हातात घेऊ लागलो, तर वास्तविक परिस्थिती आपल्याला कळणार नाही. गुजरात मधील आकडेवारी माहितीच्या अधिकारात घेतली असता मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यातील 71 दिवसांमध्ये तब्बल 1 लाख 26 हजार जणांचे मृत्यूचे दाखले तयार करण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. एरवी सरासरी महिन्याकाठी 20 हजारापर्यंत जाणारा हा आकडा अचानक दिड लाखांवर कसा पोहोचला? याचे उत्तर मात्र मिळत नाही आणि गुजरात मधील कोरोनाच्या मृतांचा सरकारी आकडा चार हजारांच्या पुढे सरकत नाही.
महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती आहे. तालुका स्तरावर देखील मृत्यूचे आकडे लपवले जात आहेत. ज्या ठिकाणी दिवसाला तीस-पस्तीस लोकांचा मृत्यू होतो, त्याठिकाणी दहा, आठ, सात, असे आकडे सांगितले जात आहेत. परंतु किमान नगरपालिका, ग्रामपंचायती यांच्या ठिकाणी जे मृत रुग्णावरती अंत्यसंस्कार केले जात आहेत, त्यांची नोंद तिथे असल्याने एकूण कोरोनाचे मृत्यू किती झालेले आहेत याची आकडेवारी मिळण्यास वाव तरी आहे. इतर राज्यांमध्ये ही आकडेवारी दाबून ठेवली जाते. ही आकडेवारी दाबून ठेवण्यामागे नेमके काय लॉजिक आहे हे समजण्यास मार्ग नाही. म्हणूनच त्यातल्या त्यात महाराष्ट्राची स्थिती बरी आहे. रामराज्यात राहणाऱ्यांचे काय?











