बारामती : महान्यूज लाईव्ह
तालुक्यातील बांदलवाडी येथील गर्भवती महिलेस २२ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली. आठवा महिना संपत आला होता. तिच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा ९० पर्यंत खाली आल्याने तिला ऑक्सिजनची गरज भासली. तेव्हा २४ एप्रिल रोजी बारामतीतील मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नववा महिना सुरू झाला आणि तिला धाप लागू लागल्याने तिला व्हेंटीलेटरवर ठेवावे लागले.. तिच्या जीवनमरणाची लढाई सुरू असतानाच तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या…
केवळ प्रसूतीकळाच नाही, तर गर्भाशयातील पाण्याला गळती सुरू झाल्याने बाळाच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झाला. अशावेळी ही गर्भवती महिला अगोदरच कोरोनाची रुग्ण, त्यातही तिची प्रकृती गंभीर अशा स्थितीत काय करायचे हा तसा प्रश्न डॉक्टरांपुढे उभा राहीला. तज्ज्ञांनी तर प्रसूतीसाठी सुरवात केल्यानंतरही तिच्या जीवाचे बरेवाईट होऊ शकते असे मत व्यक्त केले.
मात्र काही काळ विचार केल्यानंतर काहीही झाले, तरी ही प्रसूतीची शस्त्रक्रिया करावी लागेलच यावर सर्वांचे एकमत झाले. आईची तर प्रकृती गंभीरच आहे, किमान बाळाला तरी सुरक्षित रित्या जग पाहता येईल असा विचार करून सकाळी न ऊ वाजता सर्वांनी शस्त्रक्रिया कक्षात कामास सुरवात केली. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रतज्ज्ञ डॉ. विशाल मेहता, डॉ. अनुराधा भोसले, भूलतज्ज्ञ डॉ. सुजीत अडसूळ, डॉ. निकीता मेहता, फिजिशियन डॉ. सुनील ढाके, बालरोगतज्ज्ञ डॉ. अमित कोकरे व शस्त्रक्रिया कक्षातील सर्व परिचारिका, मदतनीसांच्या मदतीने या सर्वात अवघड अशा प्रसूती कार्याला सुरवात झाली.
परिस्थिती गंभीर होती.. कोरोनाने पुढे काय वाढून ठेवले आहे, डॉक्टर व मदतनीसांपैकी कोणालाही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो किंवा लागण होऊ शकते इथपासून ते रुग्णाच्या जीवापर्यंत अनेक प्रश्नांचे काहूर पुढे असतानाही डॉक्टरांनी धाडस केले. प्रत्येकाने आपापल्या ज्ञानाची ताकद लावत या महिलेची सिझेरीयन शस्त्रक्रिया केली.
व्हेंटीलेटरवर असलेल्या आईची अशा प्रसूती करण्याचा प्रकार डॉक्टरांसाठी वेगळाच धडा देणारा असल्याने दीड तास चाललेल्या या प्रक्रियेत सर्वांचाच कस लागला.. पण शेवट मात्र चांगला झाला… दोन किलो वजनाचे सदृढ बाळ जन्माला आले. या बाळाला अतितातडीच्या उपचाराची मात्र गरज असल्याने त्याला डॉ. कोकरे यांच्या दवाखान्यातील शिशू अतिदक्षता विभागात उपचारासाठी हलवण्यात आले.
एक गंभीर शस्त्रक्रिया पार पाडताना आई व बाळ दोघेही सुरक्षित राहील्याचा एक असीम आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर होता व बारामतीत कोणतीही रिस्क घेताना तसा धोका वाटत नाही असेच जणू सर्वांच्या चेहऱ्याचे हावभाव होते..विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेनंतर आईच्या प्रकृतीतही आश्वासक बदल झाल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विशाल मेहता यांनी महान्यूज शी बोलताना सांगितले. सध्या आई व्हेंटीलेटरवरून सामान्य स्थितीत परतली असून सध्या फक्त काही काळ तिला ऑक्सिजनची गरज भासणार आहे, मात्र येत्या काही दिवसांत ती पूर्ण बरी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.











