सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
मागील तीस वर्षात इंदापूर तालुका वेगवेगळ्या सामाजिक व राजकीय आंदोलनांनी ढवळून काढणारे व शोषितांच्या न्यायासाठी सातत्याने लढा देणारे एक वादळ शमले. इंदापूर चे माजी नगराध्यक्ष व माता रमाई आश्रम शाळेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांचे आज पहाटे निधन झाले.
तात्या नावाने परिचित असलेले रत्नाकर मखरे हे राज्यभरातील विविध सामाजिक संघटनांशी संबंधित होते. सन 1974 ते 2007 या कालावधीत ते इंदापूर नगरपरिषदेचे नगरसेवक होते. तर त्यांनी इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद 1990 ते 1992 या कालावधीत भूषवले. यादरम्यान त्यांनी लोकांसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण ही हा उपक्रम राबवला.
त्याचबरोबर नगरपरिषदेसमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे अर्धपुतळे उभारण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी या दरम्यानच्या काळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व दलित पँथर या दोन सामाजिक संघटनांच्या चळवळीमध्ये भाग घेतला व यामध्ये अग्रणी भूमिका बजावली.
इंदापूर तालुक्यातील शोषित दीनदुबळ्या व अन्याय ग्रस्त लोकांच्या ते नेहमी पाठीशी उभे राहिले. त्यांनी शैक्षणिक संकुल उभी करून पहिली ते कनिष्ठ महाविद्यालय पर्यंतच्या शिक्षणाची सोय सामान्यांसाठी व अतिसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली. आश्रमशाळेच्या माध्यमातून विमुक्तांच्या जीवनात शिक्षणाची ज्योत फुलवण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला.
या मुलांसाठी ते सातत्याने शेवटपर्यंत लढत राहिले. केवळ स्वतःच्याच आश्रम शाळे पुरता नाही तर संपूर्ण राज्यातील आश्रमशाळांच्या शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या सोयीसाठी व सुविधांसाठी अनेकदा राज्य सरकारशी त्यांनी या मुलांसाठी संघर्ष केला. या मुलांना काहीही कमी पडू नये यासाठी त्यांनी सदैव प्रयत्न केले. त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील अन्यायग्रस्तांच्या ते नेहमी पाठीमागे उभे राहिले.
विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन व शिक्षणाची सोय एका छत्राखाली आणणारे ते इंदापूर तालुक्यातील पहिले शिक्षण संस्था प्रमुख होते. शिवजयंतीचा सामुहिक उपक्रम त्यांनी गेली चार वर्षे सातत्याने राबवला. अडचणीत असलेल्या अन्यायग्रस्त तसेच विविध प्रश्नांशी झगडणाऱ्या सामान्य माणसांचे ते चालते-बोलते मदत केंद्र म्हणूनच परिचित होते. अत्यंत गरीब परिस्थितीतून त्यांनी आयुष्याला सुरुवात केली आणि शेवटपर्यंत ते अशाच परिस्थितीशी सर्वसामान्य माणसांशी बांधिलकी जपत राहिले. बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव एडवोकेट राहुल मखरे हे त्यांचे पुत्र होत.











