सतीश केदारी : महान्यूज लाईव्ह
शिरूर : राज्यात सुरु असलेल्या कोरोना संकटात जीव धोक्यात घालून अहोरात्र रुग्णसेवेत झोकून देऊन कर्तव्य बजावत असलेल्या मांडवगण फराटा येथील कोविड केअर सेंटरमधील परिचरिकांचा जागतिक परिचारिका दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट आली असून बेड, ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यातच कोरोनाने बदलेले रूप यामुळे ग्रामीण भागात ही त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांजवळ जाण्यास लोक घाबरतात. या कठीण प्रसंगात परिचारिका स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांना धीर देण्याचे काम करतात.
या रुग्णांची तपासणी, देखभाल डोळयांत तेल घालून त्या करीत असतात. असे महान कार्य करणाऱ्या मांडवगण फराटा कोविड केअर सेंटरच्या सर्व परिचारिका व डॉक्टरांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी मंजूषा सातपुते, पोलीस पाटील बाबासाहेब फराटे, सरपंच ज्ञानदेव कदम आदी उपस्थित होते.











