विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
लोणी काळभोर : अंगुलहून (ओरिसा) ऑक्सिजन घेऊन निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रेल्वे स्थानकात मंगळवारी (दि. ११) रात्री साडेअकराच्या वाजण्याच्या सुमारास दाखल झाली. ऑक्सिजन एक्स्प्रेसने १७२५ किमीचे अंतर अवघ्या ३७ तासांमध्ये पूर्ण केले.
अंगुल येथून सोमवारी(ता.१०) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास चार टँकरसह ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपूरच्या दिशेने रवाना झाली. मंगळवारी (ता.११)सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास नागपूर स्थानकावर दाखल झाली. क्रु ( चालक व गार्ड) बदलून तत्काळ ही गाडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. मंगळवारी रात्री पावणे अकरा वाजता दौंड रेल्वे स्थानकावर पोहोचली. गाडीला ग्रीन कॉरिडॉर असल्याने मार्गात गाडीला सर्वच सिग्नलवर ग्रीन सिग्नल देण्यात आले होते. त्यामुळे गाडीची गती जरी ताशी ५० ते ६० किलोमीटर इतकी कमी असली, तरीही ग्रीन कॉरिडॉरमुळे वेळेत मोठ्या प्रमाणात बचत केली गेली.
ऑक्सीजन एक्सप्रेस ला सर्व रेल्वेस्थानकांवर ग्रीन कॉरिडॉर दिला असल्याने फक्त क्रु (चालक व गार्ड) बदलण्यासाठी ही गाडी केवळ काही मिनिटांचा थांबा घेऊन लगेच पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होत होती. या एक्सप्रेस मधून रो-रो सेवेद्वारे चार टँकर आणण्यात आले आहेत. यातून ५५ टन ऑक्सिजनची पहिली खेप पुणे विभागात दाखल झाली आहे. ऑक्सीजन एक्सप्रेस ची पुण्यातील पहिलीच, तर महाराष्ट्रातील पाचवी फेरी ठरली आहे.
दरम्यान, लोणी रेल्वे स्थानकावरील इंजीनच्या शंटिंग लाईनला जोडूनच नव्याने रॅम्प तयार करण्यात आले. याच लाईनवर ऑक्सिजन एक्स्प्रेस आणण्यात आली. यावेळी येथे लाईटची सोय देखील करण्यात आली आहे. यावेळी रेल्वे प्रशासनासह जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. टँकरची वाहतूक करताना सुरक्षेच्या कारणास्तव टँकरच्या चाकातील हवा काढून टाकली होती. गाडी रॅम्प वर उतरून घेताना पुन्हा टँकरच्या चाकामध्ये हवा भरावी लागली. हवा भरण्यासाठी चार कम्प्रेसरची सोय करण्यात आली होती. शिवाय कम्प्रेसर रुळांजवळून दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागले तर त्या साठी दोन रिक्षा देखील आणून ठेवण्यात आल्या होत्या.











