विशाल कदम :-महान्यूज लाईव्ह
लोणी काळभोर : राज्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शासनाच्या वतीने जमाव बंदी आणि संचार बंदी सह कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत अहोरात्र निरपेक्षपणे कर्त्यव्य बजावणाऱ्या पोलीस प्रशासनावर
प्रचंड ताण आला आहे. पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याअंतर्गत तात्पुरत्या स्वरुपात २५० विशेष पोलीस अधिकारी (SPO)यांची नेमणूक करण्यात आली आहे.
पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचन, उरुळी देवाची व परिसरातील गावांमधून २५० युवक आणि युवती यांना विशेष पोलीस अधिकारी म्हणून पोलिसांनी नेमणूक केली आहे. स्थानिक युवकांच्या मदतीने विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधनात्मक उपाय योजनांमध्ये त्यांची मोठी मदत होणार आहे. असे मत अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी मांडले.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कुलच्या प्रांगणात विशेष पोलीस अधिकारी यांची सोमवारी (ता. १०) निवड करण्यात आली. त्यावेळी अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी वरील विधान मांडले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक जयंत हंचाटे, निकेतन निंबाळकर, कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, सध्या लॉकडाऊनमुळे सर्व नागरिक घरात आहेत. मात्र पोलीस रस्त्यावर नागरिकांच्या रक्षणासाठी सज्ज आहेत. सद्यस्थितीमध्ये पोलिसांवरचा ताण वाढला आहे. त्यांना मदत व्हावी म्हणून नागरिकांमधून विशेष पोलीस अधिकारी (SPO)म्हणून आपली निवड करण्यात आली आहे. त्यामुळे काम करत असताना पोलिसांच्या लौकिकाला धक्का बसेल असे कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करू नका. असेही आवाहन चव्हाण यांनी विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या युवकांना यावेळी केले.











