इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालूक्यातील निमगाव केतकी येथे वॉर्ड क्रमांक तीन व सहा मध्ये रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ५० लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती सरपंच प्रविण डोंगरे यांनी दिली.
निमगाव केतकी येथील विकास कामांसाठी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या विशेष प्रयत्नातून सन 2020-2021 या आर्थिक वर्षासाठी सुचविण्यात आलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे या योजनेंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे.
वार्ड नंबर 3 मधील खोरीवस्ती येथील रस्त्यासाठी २५ लाख रूपये तर वार्ड नंबर ६ मध्ये महादेव मंदिरापासून बारवकर वस्ती, भोंग वस्ती,व माने वस्ती यांना जोडणारा रस्ता यासाठी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
सरपंच डोंगरे म्हणाले, सरपंच पदाच्या काळाला फक्त तीन महिने पूर्ण झालेले आहेत. या काळामध्ये आपले लोकप्रतिनिधी व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मी व माझ्या सर्व सहकारी सदस्यांनी ज्या ज्या रस्त्याची मागणी केली किंवा ज्या ज्या विकासकामांसाठी प्रस्ताव पाठवले. तो प्रत्येक प्रस्ताव व विकास कामे भरणे यांनी स्वतः जातीने लक्ष घालून मंजूरच करून दिलेला आहे. निमगाव केतकीवर भरणेमामांचे खुप प्रेम आहे. या प्रेमापोटीच ते निमगावला भरघोस निधी देत आहेत. रस्त्यांच्या कामासाठी हा भरघोस निधी गावासाठी मंजूर झाल्याबद्दल प्रविण डोंगरे यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे जाहीर आभार मानले.











