सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शिरवळ व खंडाळा पोलीसांची संयुक्त कामगिरी
खंडाळा : महान्यूज लाईव्ह
खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे किरकोळ कारणांवरुन झालेल्या आठ वर्षाच्या प्रशांत चन्नाप्पा जमादार या मुलाच्या खुनाचा अवघ्या दोन तासांमध्ये उलगडा करण्यात पोलीसांना यश आले आहे. याप्रकरणी शिरवळ पोलीसांनी एका १० वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याला सातारा येथील बाल न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने अल्पवयीन मुलाची रवानगी बाल सुधारगृहामध्ये केली आहे. घरगुती किरकोळ कारणातून ८ वर्षीय मुलाचा खून झाल्याचे तपासामधून स्पष्ट झाल्यानंतर खळबळ उडाली.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नायगाव ता. खंडाळा याठिकाणी असणाऱ्या सुतारकी शिवारामधील (बिरोबा माळ) याठिकाणी मूळचे कर्नाटक राज्यातील चन्नाप्पा जमादार हे कुटुंबीयांसमवेत प्रमोद गुजर यांच्या मालकीच्या शेतामध्ये शेतमजूर म्हणून कामासाठी आहेत.
सोमवार दि. १० मे रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान चन्नाप्पा जमादार हे कामावरून सुटल्यानंतर घरामध्ये मुलगा प्रशांत हा नसल्याचे निदर्शनास आले असता, वडील चन्नाप्पा जमादार यांनी शोधमोहीम घराशेजारी केली. तेव्हा प्रशांत जमादार याचा मृतदेह रक्ताळलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला.
अवघ्या ८ वर्षाच्या मुलाचा खून झाल्याचे समजताच नायगावसह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी खुनाच्या घटनेची माहिती मिळताच तत्काळ फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, शिरवळ पोलीस निरीक्षक उमेश हजारे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ,सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, वृषाली देसाई, स्वाती पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उत्तम दबडे, पांडुरंग हजारे, राजू अहिरराव, पोलीस हवालदार रवींद्र कदम, शरद बेबले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, रवी वाघमारे, विशाल पवार, पंकज बेसके, आप्पासाहेब कोलवडकर, मदन वरखडे, सचिन वीर, स्वप्नील दौंड, नितीन महांगरे, संतोष ननावरे, सचिन शेलार, मंगेश मोझर, विकास इंगवले, तुषार कुंभार, दिग्विजय पोळ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी घटनास्थळाची पाहणी केली असता व परिसराची माहिती घेतली असता घरगुती कारणातून एका १० वर्षीय अल्पवयीन मुलाने प्रशांत जमादार याचा खून केल्याचे तपासामध्ये अवघ्या दोन तासांमध्ये स्पष्ट झाले. याप्रकरणी सातारा येथील रिओ श्वानाची व ठसेतज्ज्ञाची मोलाची मदत झाली.
याप्रकरणी शिरवळ पोलीसांनी १० वर्षीय अल्पवयीन युवकाला ताब्यात घेत सातारा येथील बाल न्यायालयासमोर हजार केले असता न्यायालयाने सदरील अल्पवयीन मुलाची बाल सुधारगृहामध्ये रवानगी केली आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक उमेश हजारे हे करीत आहेत.











