मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यामध्ये सध्या लसीचा साठा कमी उपलब्ध आहे दुसरा डोस ज्यांना वेळेत देणे आवश्यक आहे त्यांना तो वेळेत दिला नाही तर पहिला डोस देखील वाया जाऊ शकतो म्हणूनच आता 18 ते 44 या वयोगटासाठी आलेल्या लशी 45 वर्षावरील वयोगटासाठी वळविण्यात येणार आहे. त्यामुळे तूर्तास 18 वर्षावरील लसीकरणाचा वेग स्लो डाऊन राहील असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केले.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. यामध्ये सरकारकडे सध्या 35 हजार कोव्हॅक्सिन लसीचा साठा असून शासनाने खरेदी केलेली तीन लाख कोव्हॅक्सिन लस 45 वर्षावरील व्यक्तींना द्यावी लागणार आहे. त्यांना जर वेळेत दुसरा डोस दिला नाही, तर त्यांना केलेले पहिले लसीकरण वाया जाऊ शकते.
सध्या लसीचा साठा अत्यंत कमी प्रमाणात आहे. त्यामुळे 45 वर्षावरील वयोगटातील लोकांसाठी, सध्याचा 18 ते 45 वयोगटातील लसीचा साठा वळविण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढील काळात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लसीकरण केले जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात उद्याच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये घट आली असून कोरोना मुक्त होण्याचा दर वाढत आहे. आतापर्यंत राज्यामध्ये एक कोटी 84 लाख लोकांना लसीकरण करण्यात आले आहे, परंतु आता लसीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद आहेत असे टोपे यांनी स्पष्ट केले.











