बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत सात दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर आज दुपारी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत पुन्हा सात दिवसांचा लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात सर्वंकष चर्चा झाली. सात दिवस नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली असून, आणखी सात दिवस हा लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी चर्चा केली. यामध्ये उपस्थित पदाधिकारी व व्यावसायिक उद्योजक यांच्या चर्चेनंतर लॉकडाऊन पुन्हा सात दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा मात्र घरोघरी पोहोच करण्यासाठी प्रशासनाने अनुमती दिली आहे. यामध्ये किराणा व भाजीपाला साहित्याचा समावेश आहे. दूध वितरण सकाळी सात ते नऊ दरम्यान होणार आहे. दवाखाने व मेडिकल वगळता इतर सर्व सेवा मागील लॉकडाऊन प्रमाणेच बंद राहतील.
आज येथील प्रशासकीय इमारतीमध्ये प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, तहसीलदार विजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव हे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अॅड. राजेंद्र काळे, मनसेचे जिल्हाप्रमुख अॅड. सुधीर पाटसकर, नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, उद्योजक धनंजय जामदार, सतीश फाळके, बारामती व्यापारी महासंघाचे नरेंद्र गुजराथी, स्वप्नील मुथा, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर, मिलिंद सालपे, बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप, पांडूरंग कचरे यांच्यासह शहरातील विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत कोरोनाची सद्यस्थिती या संदर्भात प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार विजय पाटील यांनी माहिती दिली. तसेच उपाययोजना संदर्भात मुख्याधिकारी किरणराज यादव व गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी अनुक्रमे शहर व तालुक्यातील माहिती दिली. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी एकूणच कोरोनाची परिस्थिती, रुग्णांची संख्या, तुलनात्मक प्रमाण याचा विचार करता कोरोनाची रुग्णसंख्या पूर्ण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व कायदा व सुव्यवस्थेची स्थिती या संदर्भात माहिती दिली.
दरम्यान यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान नरेंद्र गुजराथी, सुनील सस्ते, पांडुरंग कचरे, सतीश फाळके यांनी या चर्चेत भाग घेताना काही त्रुटी निदर्शनास आणून दिले. लसीकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याबद्दल सुनील सस्ते आक्रमक झाल्यानंतर नगरपरिषदेचे गटनेते सचिन सातव देखील आक्रमक होत त्यांनीही लसीकरणामध्ये हस्तक्षेप होत असल्याचे सांगून त्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. तर मनसेचे नेते सुधीर पाटसकर यांनी पहाटे तीन ते चार या वेळेत लसीकरणासाठी नोंदणी होते असा प्रश्न उपस्थित केला. मात्र त्यावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी व प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी यामधील वस्तुस्थिती स्पष्ट केली.











