बारामती : महान्यूज लाईव्ह
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता
बारामतीत वयाच्या नव्वदीत असणाऱ्या दाम्पत्याने कोरोनावर मात केली. ९१ वर्षांचे लक्ष्मण चौधरी आणि ८४ वर्षाच्या प्रभावती चौधरी यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली. बारामतीच्या क्रिटीकेअर या कोविड हाॅस्पीटलमधून काल त्यांना डिस्चार्ज देताना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारक यांनी त्यांचे पुष्पवृष्टी ने कौतुक केले.
चौधरी दाम्पत्य पेशाने शिक्षक होते. त्यांना कोरोना ची लागण झाल्यानंतर काय करावे असा प्रश्न त्यांच्या सातारा येथे शिक्षक असलेल्या मुलाच्या मनात आला. तेव्हा त्यांनी आरोग्य हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. राहुल जाधव, भूलतज्ञ डॉ. सुजित अडसूळ, स्त्री रोग तज्ञ डॉ. अजित देशमुख आणि डॉ. तुषार गदादे यांच्याशी संपर्क साधला. वयाची नव्वदी पार केली असल्याने या कोरोनाग्रस्त दाम्पत्याच्या बाबतीत खूप काळजी घ्यावी लागेल याची जाणीव असल्याने डॉक्टरांनी त्यांना क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सूचना केली.
या दाम्पत्यावर याच दवाखान्यात उपचार सुरू होते. काल त्यांना या दवाखान्यातून घरी जाण्याची परवानगी मिळाली. त्यांच्या मुलाने येथील उपचाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, तरुण युवकांनी कोरोनाची भीती बाळगू नये, आपण यातून बरे होणार आहोत हा आशावाद बाळगून कोरोनाशी लढावे असे मत व्यक्त केले.
दरम्यान या दांपत्यावर उपचार करणाऱ्या डॉ. गदादे, डॉ. देशमुख, डॉ. अडसूळ यांनी इच्छाशक्ती सर्वात महत्त्वाची असून, या दाम्पत्याने कोरोनाबाधितांपुढे आदर्श ठेवल्याचे मत व्यक्त केले. कोरोनाच्या मागील लाटेत देखील मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनावर मात केली. या लाटेत देखील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने कोरोना शवर मात यशस्वीरीत्या करत आहेत याचा आनंद वाटतो असे मत या तिघांनीही व्यक्त केले.











