सुगाव येथे उजनीच्या पाण्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनार्थ पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
सोलापूर जिल्ह्यातील पुढा-यांनी उजनीच्या पाण्यावर राजकारण करत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका करत आरोप करायला सुरुवात केली आहे, यावरुन पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने काल पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सुगाव येथे उजनी धरणाच्या पाण्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील काही बाजार बुनगे स्वतःला नेते समजत आहेत अशी खरपूस टीका करत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल नाहक बोलाल तर खबरदार, त्यांना जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशारा संजय सोनवणे यांनी दिला.
यावेळी बोलताना संजय सोनवणे यांनी सांगितले की, उजनीच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्याचा जेवढा अधिकार आहे, तेवढाच अधिकार इंदापूर तालुक्यातील जनतेचा सुद्धा आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही बाजारबुणगे स्वतःला नेते समजतात. त्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली आहे. या नेत्यांचा समज झाला आहे की, आंदोलन केल्यावर आम्ही चर्चेत येवू.
दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना 5 टीएमसी पाणी देऊन न्याय दिला आहे. त्यामुळे पीपल्स रिपब्लिकन पार्टी त्यांचे जाहीर अभिनंदन करत आहे. इंदापूर तालुक्याने या उजनी धरणासाठी 21 गावांवर तुळशीपत्र ठेवले. कित्येकांच्या संसाराची राखरांगोळी झाली. 12 हजार हेक्टर बुडीत क्षेत्र त्यांनी धरणासाठी दिले. अशावेळी सोलापूरचे जे बाजारबुणगे आंदोलन करत आहेत, त्यांनी हे समजून घेतले पाहिजे.
सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना अडचणीत आणून सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्रीपद मिळेल असे सोलापूर जिल्ह्यातील काही नेत्यांना असे स्वप्न पडली आहेत. पण असं होणार नाही. भरणे यांच्या सारखं स्वच्छ नेतृत्व बघायलाही मिळणार नाही. भरणे यांनी सोलापूर येथे गेल्या 30 तारखेला सांगितले होते की, मी सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी घेणार नाही. एवढे सांगूनही काही पुढारी या पाण्याचे राजकारण करत आहेत. इथून पुढे दत्तात्रय भरणे यांच्यावर कुणी टीका किंवा आंदोलन केले, तर पीपल्स रिपब्लिकन पार्टी जशाच तसे उत्तर देणार आहे असे सोनवणे म्हणाले.











