वाई : महान्यूज लाईव्ह
येथील वाई अर्बन परिवार यांच्यावतीने शासनाच्या कोव्हिड केअर सेंटरसाठी 50 लोखंडी काँटस उपलब्ध करून देण्यात आल्या. वाई अर्बन परिवाराने सामाजिक जाणिवेतून वाईच्या प्रांताधिकारी सौ. संगीता राजापुरकर- चौगुले, तहसीलदार रणजित भोसले यांच्याकडे लोखंडी काँटस सूपूर्द केल्या आहेत अशी माहिती वाई अर्बन परिवाराचे प्रमुख सी.ए. चंद्रकांत काळे यांनी दिली.
श्री. काळे म्हणाले, वाई अर्बन परिवाराच्या वतीने नुकतेच कोरोना केअर सेंटरसाठी 100 बेडस उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु वाई परिसरातील रूग्णांची हेळसांड थांबविण्यासाठी लोखंडी काँटस देखील आवश्यक असल्याचे मत शासकीय अधिका-यांनी व्यक्त केले होते. त्याचा लगेचच विचार करून वाई अर्बन परिवाराने लोखंडी काँटस उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
वाई अर्बन परिवाराचे प्रमुख सी.ए. चंद्रकांत काळे, राजेंद्र चावलानी, अरूण देव व अन्य सदस्यांनी परिवारामार्फत लोखंडी काँटस देण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यासाठी वाई अर्बन परिवारातील सदस्यांनी वैयक्तिक सहभागातून पुणे येथून नवीन 50 लोखंडी काँटस विकत घेतल्या व वाईतील कोरोना केअर सेंटरसाठी उपलब्ध करून दिल्या.
प्रांताधिकारी सौ. संगीता राजापूरकर- चौगुले यांनी वाई अर्बन परिवाराने दिलेले 100 बेडस व 50 लोखंडी काँटची मदत अनमोल असल्याचे मत व्यक्त करत वाई अर्बन परिवाराप्रती कृतज्ञता व्यक्त केली. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनी आपापल्या परिने कोरोना संकटावर मात करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या वितरणप्रसंगी तहसीलदार रणजित भोसले, वाई अर्बन परिवारातील सदस्य मदनलाल ओसवाल, अॅड. प्रतापराव शिंदे, विवेक भोसले, मनोज खटावकर, स्वरूप मुळे, अनिल देव, श्रीपाद कुलकर्णी, चंद्रशेखर काळे, वाईचे मंडलाधिकारी राजेश झेले उपस्थित होते.











