पुणे : महान्यूज लाईव्ह
यावर्षी भारतात आणि महाराष्ट्रातही जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सॅस्कॉफ या (साऊथ एशियन क्लायमेट आऊटलुक फोरम) संस्थेने या संदर्भात अंदाज व्यक्त केला आहे.
प्रशांत महासागरातील स्थिती, हिंदी महासागरातील डायपल, हिवाळ्यातील बर्फाचं असलेलं अच्छादन, त्यातील फेरबदल, जमिनीचे वाढते तापमान आणि जागतिक घटकातील वातावरण बदलाची स्थिती या सर्व स्थितीवरून ‘सॅस्कॉफ’ने हा अंदाज वर्तवला आहे.
प्रशांत महासागरातील ला नीना ची स्थिती सध्या निवळत आहे. एल निनो ची स्थिती निर्माण होत असल्याने मोसमी पावसाच्या हंगामात महासागराच्या पश्चिम भागातील तापमान काहीसे गरम राहील असे संकेत नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे अफगणिस्तान, पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व भारतात पाऊस कमी पडणार असला, तरी दक्षिण आणि मध्य भारतात तसेच महाराष्ट्रात पाऊस सरासरी आणि सरासरीपेक्षा अधिक राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पाऊस वेळेतच होईल अशी ही यंदाची स्थिती वर्तवण्यात आली आहे.











