विशाल कदम: महान्यूज लाईव्ह
लोणी काळभोर : पुणे शहरासह, पिंपरी चिंचवड व जिल्ह्याच्या विविध ठिकाणी जबरी चोरी, घरफोडी व वाहनचोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट क्रमांक ६ च्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे ६ लाख ४४ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
अमरसिंग जगरसिंग टाक ( रा. गोसावीवस्ती, बिराजदारनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील अवैध धंदे, बेकायदेशीर कृत्य करणारे गुन्हेगार तसेच शरीराविरुध्द व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे गुन्हेगार यांचेवर कठोर कारवाई करून गुन्हयांचे व गुन्हेगारांचे समूळ उच्चाटन करण्यासंदर्भातील धोरण पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वीकारले आहे.
असे गुन्हे तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पोलीस आयुक्त गुप्ता दिल्या होत्या. त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपीस पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, गुन्हे शाखा क्रमांक २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ पोलीस निरीक्षक गणेश माने, अंमलदार नितीन मुंढे, मच्छिंद्र बाळके, राहुल माने, ऋषिकेश टिळकर, प्रतिक लाहिगुडे, शेखर काटे, नितीन धाडगे व संजय देशमुख यांचे पथक तयार करण्यात आले होते.
सदर गुन्ह्याचा तपास करताना पोलीस नाईक नितीन मुळे यांना गुन्हयातील आरोपीची माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. सदर पथकाने आरोपी अमरसिंग टाक यास सापळा रचून ताब्यात घेतले.
आरोपीकडून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किमतीची सैन्ट्रो कार, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १ लाख ४४ हजार रुपये किमतीची सोन्याचे दागिने, लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ५०,००० रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटार सायकल आणि वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १ लाख रुपये किमतीची व्हेस्पा मोपेड गाडी असा एकुण सुमारे ६ लाख ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी अमरसिंग टाक याच्याकडे अधिक चौकशी केली असता, आरोपी अमरसिंग व त्याचा साथीदार जयपालसिंग ऊर्फ मोन्यासिंग राजपालसिंग टाक या दोघांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमएच १२ पीएच ९१३८ या क्रमांकाची सैन्ट्रो कार फिर्यादीच्या ताब्यातुन जबरीने चोरुन घेवून गेलो असल्याची कबुली दिली आहे. जयपालसिंग यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी व वाहनचोरी असे एकुण ६ गुन्हे दाखल आहेत.
पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या ९ गुन्ह्याची कबुली आरोपी अमरसिंग टाक याने पोलिसांनी दिली आहे. तसेच अधिक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आरोपीला न्यायालयाने पोलीस कस्टडीमध्ये रिमांड दिली आहे. तरी, पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मच्छिंद्र बाळके करीत आहेत.











